पृथ्वीने भक्तिभावाने विनम्र होऊन जेव्हा भगवान श्रीकृष्णांची स्तुती करून प्रार्थना केली, तेव्हा त्यांनी भौमासुराचा पुत्र भगदत्ताला अभयदान दिले आणि सर्व प्रकारच्या संपत्तींनी संपन्न अशा भौ?मासुराच्या राजवाडय़ात प्रवेश केला.
ऐसी पाहतां भौमभुवनें । तेथ देखता झाला ललनारत्ने । भौमें संगृहिलीं प्रयत्ने । समराङ्गणें करूनियां । तेथे गेल्यावर भगवंतांनी पाहिले की, भौ?मासुराने राजांना जिंकून त्यांच्या सोळा हजार राजकुमारी तेथे आणून ठेवल्या होत्या.
आधींच उपवर कन्यारत्ने । विशेष दिअत्ये रोधिलीं यत्ने। तेथोनि सुटिकेच्या प्रयत्ने। सांडविलीं जीं दु:खार्तें । तेथ अवचित नरवीररत्ना । दैवें पाहती त्यांचे नयन । म्हणती प्रविष्ट झाला कोण। लावण्यभुवन ये ठायीं । मनेंकरूनि तिहीं वरिला । म्हणती दैवें प्राप्त केला । आम्हां हा अभीष्ट पति जोडला । तरी तुष्टला जगदीश । मजकारणें हा अभीष्ट पति । दैवें अनुकूळ जरी यदर्थीं । विधिही प्रेरक हो याप्रति । ऐशा भाविती पृथक्पृथक् । सप्रेम आस्तिक्मयभावें करूनी । आपुलाल्या अंतःकरणीं । कृष्ण वरिती अवघ्या जणी । म्हणती भवानी तुष्टो कां।माता पिता तुटला आम्हा । वरपडय़ा झाल्या होतों भौमा । कृपा आली पुरुषोत्तमा । तरी नरललामा योजियलें । म्हणती मनोरथा पावो सिद्धी । यदर्थीं साह्य हो कां विधि । ऐसी जाणोनियां तयांची बुद्धि । करुणानिधि कळवळिला ।
अंत:पुरात आलेल्या नरश्रे÷ भगवान श्रीकृष्णांना जेव्हा त्या राजकुमारींनी पाहिले, तेव्हा त्या अत्यंत मोहित झाल्या आणि त्यांनी आपल्या भाग्यानेच आपल्याला मिळवून दिलेल्या त्यांना मनोमन प्रियतम पती म्हणून वरले. त्या राजकुमारींपैकी प्रत्येकीने स्वतंत्रपणे आपल्या मनात हाच भाव बाळगला की, ‘हे श्रीकृष्णच आपले पती व्हावेत आणि विधात्याने आपली ही अभिलाषा पूर्ण करावी’ अशा प्रकारे त्यांनी आपले हृदय भगवंतांना अर्पण केले. तेव्हा श्रीकृष्णांनी त्यांना सुंदर सुंदर वस्त्रे परिधान करवून, पालख्यात बसवून द्वारकेला पाठविले आणि त्यांच्याबरोबर पुष्कळसे धन, रथ, घोडे तसेच अमाप संपत्तीही पाठविली. ऐरावताच्या वंशात जन्मलेले, अत्यंत वेगवान, चार चार दातांचे, शुभ्र असे चौसष्ट हत्तीसुद्धा भगवंतांनी तेथून द्वारकेला पाठविले.
जाऊनियां शक्रसदना। आह्लाद केला संक्रंदना । नमिलें अदितिमातृचरणा। सत्यभामे समवेत। दिव्य कुंडलें भौमापहृतें। आणोनि समर्पिलीं मातेतें। देखोनि आल्हादभरित चित्ते । आशीर्वचनें त्या दिधलीं ।
यानंतर भगवान श्रीकृष्ण अमरावतीतील इंद्रभवनात गेले. तेथे देवराज इंद्राने पत्नी इंद्राणीसह सत्यभामा आणि श्रीकृष्णांची पूजा केली, तेव्हा भगवंतांनी अदितीची कुंडले तिला दिली. देवांची माता अदितीने आनंदित मनाने कृष्णाला अनेक आशीर्वाद दिले.
द्वारके निघतां श्रीगोपाळा । बोलिली सत्राजिताची बाळा। पार्यातग्रहणीं विसर पडला । तो घेतला पाहिजे। हरि म्हणे घेतां कल्पद्रुम । विक्षेप मानील अमरोत्तम । घडेल अमरेंसीं संग्राम । त्यांसीं विक्रम केंवि घडे । ऐकोनि हांसिली सत्यभामा। निर्जर कांपती ज्याचिया नामा । क्षणार्धें मारिलें तया भौमा । किमर्थ आम्हां भेडविसी । Ad. देवदत्त परुळेकर








