गोरटे की सावळे त्या मोल नाही फारसे
नेहमीप्रमाणेच बोरकरांची ही कविता त्यांच्याच मूळ चालीत सुंदर वाटायची! त्यातलं उपमासौंदर्य मनाला वेड लावतं. प्रांजळाचे आरसे? वाह! किती अनुपमेय तुलना ही! प्रांजल या शब्दाचा अर्थच मुळी स्पष्ट, विशुद्ध, निष्कपट, निर्मळ, पारदर्शी असा आहे. म्हणजे ज्या चेहऱयावर कपटाची छाया नाही, ज्या चेहऱयावर मनातले भाव अगदी प्रामाणिकपणे उमटतात, जे पोटी असतं तेच ओठी येतं ते चेहरे प्रांजळ म्हणायचे. जिथे काही दडवादडवी मुळी नाहीच आणि ज्या अंतःकरणात गढूळपणा नाही त्याचं स्पष्ट प्रतिबिंब त्या चेहऱयावर उमटतं. आणि म्हणूनच असे चेहरे? हे सुंदरच दिसतात. मग आपल्या लक्षात येतं की प्रतिबिंब पाडणे हे तर आरशाचं काम! आरसा तुमच्याशी खोटं बोलणार नाही. तुम्ही जसे आहात तसेच दिसणार. आपल्याकडे जे नाही ते आरशात तरी कसं दिसावं? आणि त्याहून सहज दिसणाऱया गोष्टी तर आरशात पाहायचीही गरज नसते. ‘हातच्या काकणाला आरसा कशाला?’ असं म्हणतातच ना? पण इथे तर चेहरेच आरसे होऊन गेले आहेत. तेही प्रांजलाचे अर्थात निर्मळ पारदर्शी अंतःकरणाचे. आरशाने आरशात पहावं तसंच हे झालं.. म्हणाल तर मोठी गमतीशीर गोष्ट आहे आणि म्हणाल तर खूप खोलवर अर्थ दडला आहे त्यात. बाकी आरशात पाहण्याचा मोह इतका काही जबर असतो की कुणाच्याही समोर आरसा आणि जवळ त्रैलोक्मयसुंदरी जरी असली तरी आधी तो आरशातच पाहील. प्रतिबिंब पाहण्याचा मोह, आपण कसे दिसतो याची उत्सुकता, स्वतःला नटवण्याची ओढ या सगळय़ात महत्त्वाचा साथीदार असतो तो आरसाच.
पाण्यातले पहाता प्रतिबिंब हासणारे आले मनात नवखे उमलून भाव सारे
सौंदर्य आणि त्याची भूल.. तारुण्य आणि त्याची नैसर्गिक धुंदी हे सगळं या गाण्यातून पाण्यासारखंच वाहताना दिसतं. दिसते ती मीच आहे का? खरंच जर का माझं रूप एवढं जर देखणं असेल तर या सृष्टीच्या सौंदर्याशी माझं काय नातं आहे? मनातल्या भावना चेहऱयावर दिसतात का? आज हे मला काय होतंय? असे प्रश्न त्या तरुणीला पडत असावेत. आरसा वेडं करून जातो तो असा..कधीच आरशात न पाहणाऱयालाही कधी कधी आरशात पहावं वाटतं तेव्हा ती व्यक्ती एकांतात आरशात पहाते आणि स्वतःशीच गूज करते. पण अशा आपल्या प्रियेला एक प्रियकर प्रेमाच्या सुरात पण जास्त विचारतो…
ये आईने से अकेले में गुफ्तगू क्मया है?
जो मैं नहीं हूँ तो फिर तेरी रुबरू क्मया है?
ऑल द ग्रेट हरिहरनजींनी हे गाणं गायलंय जी एक गजल आहे. शब्द आहेत तब्बल सात गजलकारांचे! साहजिकच आहे. एकेक शेर हा अक्षरशः सव्वाशेर आहे. हरेक शेर ही स्वतंत्र कविता आहे. ताहिर फराज, मुनव्वर मासूम, मुसाफिर वारसी, वली आरसी, कैफ भूपाली, कैझर उल जफरी आणि शहरयार. ही गजल लिहून उलगडायची म्हटली तर पान पुरणार नाही खरं तर! पण यातही सर्वात जास्त भावते ती आरशाची जादू! तो प्रियकर ठामपणे म्हणतो की एकांतात आरशासमोर बसून तुझं काय गूज चाललंय गं? आणि कोणाशी? आरशासमोर बसून ज्याच्याशी बोलतेस तो जर मी नाही तर आहे कोण? माझ्याशिवाय तुझी ओळखच काय आहे? ज्जे ब्बात! गजलचा नेमकेपणा नेहमी अंगावर येतो…पुढचा प्रत्येकच शेर म्हणजे अर्थात बिंब प्रतिबिंब याचाच खेळ आहे.
इसी उम्मीद पे काटी है जिंदगी मैंने
वो काश पूछते मुझसे की आरजू क्मया है?
याच इच्छेवर मी माझं अख्खं आयुष्य घालवलं की एकदा तरी ती विचारेल की माझी इच्छा काय आहे? वाह… शब्दांचं? बिंब की अर्थाचं प्रतिबिंब? काय म्हणावं?
माणसाच्या मनाचं प्रतीक म्हणजे चेहरा आणि चेहऱयाचं प्रतिबिंब म्हणजे आरसा! म्हणून तर
सीने में जलन आँखो में तूफान सा क्मयों है?
इस शहर में हर शख्स परेशान सा क्मयो है?
असं गाणारे सुरेश वाडकर विचारून जातात की
ये कौन सी नई बात नजर आती है हम में
आईना हमें देख के हैरान सा क्मयो है?
आपल्या चेहऱयाचं हुबेहूब प्रतिबिंब दाखवणारा आरसाही हैराण व्हावा इतकं काय बदललं आहे माझ्यात? काय नवीन घडलं आहे माझ्या अस्तित्त्वात? हा प्रश्न खरं तर टोचतोच! तशीही सध्या ऐतिहासिक माणसं पहायलाच मिळत नाहीत.
गर्दीत माणसांत माणूस शोधतो मी
कोलाहलात साऱया माणूस शोधतो मी
अशीच अवस्था असते. पुस्तकात पाहिलेली माणसं आता पहायला मिळतात कुठे? ज्यांना मन भरून ऐकलं ती माणसं पहायला नाही मिळत. म्हणून
अंदाज आरशाचा वाटे खरा असावा
बहुतेक माणसाचा तो चेहरा असावा
असं भाकित करावं लागतं! हो. आरसा जाणे आणि चेहरा जाणे. असं म्हणावं लागेल. तरीही आपल्या प्रेयसीच्या चेहऱयाला आरशाची उपमा देण्याचा मोह प्रियकराला आवरत नाहीच.. ‘तेरा चेहरा है आईने जैसा’ हे तोंडी येतंच! क्मयों न देखूं है देखने जैसा! जगजीत सिंग यांचा ही गजल गातानाचा जो काही अंदाज आहे त्याला सलाम! मजा येते त्यांच्या खास ढंगातली ही गजल ऐकताना. त्याचप्रमाणे रोखठोक असणं हे तर आरशाचं वैशिष्टय़! आणि सौंदर्याप्रमाणेच वैगुण्य दाखवणं हेही असतं त्याचं काम! माणसांचं भलेही लक्ष नसेल पण समाज त्याला आरसा दाखवून जाग्यावर आणल्याशिवाय राहत नाही. या आशयाची हरिहरन साहेबांनीच गायलेली एक गजल आहे.
मयकदे बंद करें लाख जमानेवाले
शहर में कम नहीं आँखो से पिलानेवाले
जिच्या एका शेरात ते असं म्हणतात की,
अपने ऐबों पे नजर जिनकी नहीं होती है
आईना उनको दिखाते है जमानेवाले
ज्याला स्वतःचे दोष दिसत नाहीत त्याने सध्याच्या भाषेत म्हणायचं तर ट्रोलिंगला तयार रहावं. त्याला आरसा दाखवण्याचं काम समाज करत असतोच.
अत्यंत रूपवती असलेली ललना ‘मी कशाला आरशात पाहू गं? मीच माझ्या रूपाची राणी गं!’ असं म्हणत स्वतःचा तोरा मिरवत असेल. तिला स्वतःबद्दल एवढीच जर खात्री असेल तर ती सारखी सारखी स्वतःला आरशात का बरं न्याहाळत असेल? कधीकधी स्वतःचं नव्हाळ वय आणि तारुण्य तिलाच पेलवत नाही असं तर नसेल? गाणे उसळे उभ्या देही कशी गाऊ गं? असं विचारणारा हा स्वर आहे उषाताई मंगेशकर यांचा आणि गीतकार आहेत मुरलीधर गोडे. आरसा या विषयावर गजल खूप आहेत. सुरेश भटांच्या एका द ग्रेट गाण्याच्या एका कडव्यात शब्दांसाठी काही अचूक योजना जुळून येत नव्हती. धडपड करूनही ते गाणं मनासारखं होईना. शब्दांवर प्रभुत्त्व असलेल्या शांताबाई शेळके यांनी चटदिशी योग्य ते शब्द सुचवले आणि गीत पूर्ण झालं. आरशाचा एवढा आणि असा सन्मान फक्त कलाकारच करतात. तसंही त्यांचा तो कायमचा साथी असतो.
-अपर्णा परांजपे-प्रभु








