सीएमएस-01 या संदेशवहन उपग्रह अवकाशात : ‘पीएसएलव्ही’द्वारे यशस्वी प्रक्षेपण
श्रीहरिकोटा / वृत्तसंस्था
भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्त्रो) श्रीहरिकोटामधील सतीश धवन अवकाश केंद्रामधून गुरुवारी सीएमएस-01 या संदेशवहन उपग्रहाचे (कम्युनिकेशन सॅटेलाईट) यशस्वी प्रक्षेपण केले. हे प्रक्षेपण गुरुवारी दुपारी 3 वाजून 41 मिनिटांनी पीएसएलव्ही-सी 50 रॉकेटमधून करण्यात आले. भारताची ही कोरोना काळातील दुसरी आणि या वर्षातील तिसरी मोहीम आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या मोहीमेच्या यशस्वीतेबद्दल इस्रोच्या टीमचे विशेष कौतुक केले आहे.
सीएमएस-01 हा भारताचा कम्युनिकेशन सॅटेलाईट आहे. या उपग्रहाच्या यशस्वी प्रक्षेपणामुळे देशातील दूरसंचार यंत्रणा अधिक गतिमान आणि सुलभ होणार आहे. हा उपग्रह पुढील सात वर्षे काम करणार आहे. या उपग्रहाच्या मदतीने होणाऱया संदेशवहनाद्वारे भारताच्या जमिनी क्षेत्रासह अंदमान-निकोबार आणि लक्षद्वीपचा काही भागही व्यापला जाणार आहे. ही इस्रोची या वर्षातील अखेरची मोहीम आहे. या यशस्वी मोहीमेनंतर सदर उपग्रह अवकाशात व्यवस्थितपणे मार्गक्रमण करू लागला असून त्याचे पुढील कामही नियोजितपणे सुरू झाल्याचे इस्रोचे अध्यक्ष के. सिवान यांनी सांगितले. ‘व्हेरी वेल’ अशा शब्दात त्यांनी या मोहीमेची प्रशंसा केली आहे.
इस्रो उपग्रह प्रक्षेपणामुळे मोबाईल व टीव्हीचे सिग्नल वाढविण्यात मदत होणार आहे. इस्रोचे शास्त्रज्ञ गेल्या अनेक दिवसांपासून या उपग्रहाच्या प्रक्षेपणाची प्रतीक्षा करीत होते, परंतु हवामानातील अडचणींमुळे त्याला परवानगी मिळाली नव्हती. तथापि, आता या मोहीमेच्या यशस्वी प्रक्षेपणामुळे इस्रोमधील टीमने आनंद व्यक्त केला आहे.
पृथ्वीच्या सर्वात दूरस्थ कक्षेत स्थापित
या उपग्रहाद्वारे पृथ्वीची सर्वात दूरस्थ कक्षा स्थापित केली जाईल. सीएमएस-01 पृथ्वीच्या सर्वोच्च कक्षात किंवा 42,164 किलोमीटर या सर्वात दूरस्थ बिंदूत स्थापित केला जाईल. या कक्षामध्ये स्थापित केल्यावर, हा उपग्रह त्याच वेगाने पृथ्वीभोवती फिरेल आणि पृथ्वीवरून पाहिल्यावर आकाशात एखाद्या ठिकाणी स्थिरावल्याचा भास निर्माण करेल, अशी माहिती इस्रोकडून देण्यात आली.









