वृत्तसंस्था / नवी दिल्ली :
मागील काही महिन्यांपासून कोविडमुळे संपूर्ण देशभरात लॉकडाऊनची घोषणा केली होती. यामुळे विविध उद्योगधंदे आणि व्यवसाय प्रभावीत झाल्याचे पहावयास मिळाले. याच दरम्यान दूरसंचार कंपन्यांचे एप्रिल महिन्याच्या दरम्यान 82 लाख ग्राहक कमी झाले आहेत. कोविडच्या वाढत्या संसर्गामुळे दूरसंचार कंपन्या आगामी काळातही दबावाचा प्रवास करत राहणार असल्याचा अंदाज इंडिया रेटिंग्स ऍण्ड रिसर्चकडून व्यक्त करण्यात येत आहे.
सदर प्रवासात सर्वाधिक नुकसान भारती एअरटेल आणि व्होडाफोन आयडीया यांना झाले आहे. परंतु दुसऱया बाजूला मात्र रिलायन्स जिओचे ग्राहक वाढत गेल्याचे पहावयास मिळाले आहे. उपलब्ध अहवालानुसार मार्च आणि एप्रिलमध्ये ग्राहकांची संख्या अनुक्रमे 28 आणि 82 लाखांनी महिन्यांच्या पातळीवर कमी झाली आहे.
आगामी काळात दबाव कायम
कोविडने जगभरात थैमान घातलेले आहे. यामुळे विविध देशांची अर्थव्यवस्था कोलमडून पडली आहे. या वास्तवामुळे सहाय्यता मिळवण्यासाठी अनेक कंपन्या प्रयत्न करीत आहेत. दूरसंचार कंपन्यांमधील दबावाचे वातावरण येत्या काळातही कायम राहण्याची चिंता या अहवालामधून व्यक्त करण्यात आली आहे.









