प्रवेश, परीक्षेसह अन्य अपडेट विद्यार्थ्यांना मिळणार
अहिल्या परकाळे/कोल्हापूर
शिवाजी विद्यापीठ म्हंटले की जूनमध्ये प्रवेश, ऑक्टोंबरमध्ये परीक्षा ठरलेली असते. परंतू कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रवेश प्रक्रिया किंवा परीक्षाही ठरलेल्या वेळेत झालेल्या नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांना पूरक माहिती देण्यासाठी दूरशिक्षण विभागाच्या वतीने प्रवेशपूर्व नोंदणीसाठी क्यूआर कोड दिलेला आहे. क्यूआर कोड स्कॅनिंग केला की प्रवेश अर्ज ओपन होतो. अर्ज भरल्यानंतर विद्यार्थ्यांची प्रवेशासाठीची नावनोंदणी दूरशिक्षणकडे होते. नोंदीत विद्यार्थ्यांना मोबाईलवर दूरशिक्षणकडून दररोज अपडेट मिळणार आहेत. तसेच यातून दूरशिक्षणचे विद्यार्थी, प्राध्यापक, कर्मचाऱयांनाही टेक्नोसॉव्ही करण्याचा विद्यापीठाचा प्रयत्न आहे.
दूरशिक्षणचा क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर विद्यार्थ्यांना सध्या प्रवेशासंदर्भात माहिती मिळणार आहे. परंतू भविष्यात दूरशिक्षणच्या विद्यार्थ्यांना घरबसल्या प्रवेश घेणे, परीक्षा अर्ज भरणे, हॉलटिकीट मिळवणे, ऑनलाईन लेक्चर, अभ्यासक्रमाच्या व्हीडीओ, ऑडीओ क्लिपदेखील ईमेल, व्हॉटसऍपच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे दूरशिक्षणच्या 81 स्टडी सेंटरवर 13 अभ्यासक्रमाचे शिक्षण घेत असलेल्या 5 हजार विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. सध्या दूरशिक्षणचे स्टडी मटेरियल ऑनलाईनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न सुरू आहे. तसेच अभ्यासक्रमाचे ऑडीओ व व्हीडीओ तयार करून विद्यार्थ्यांना पाठवले जाणार आहेत. त्यासाठी दूरशिक्षण विभागातील प्राध्यापकांना तंत्रज्ञान प्रशिक्षण दिले आहे. यातून विषयावर प्रभुत्व असलेल्या प्राध्यापकांना आधुनिक तंत्रज्ञान कसे हाताळायचे याची माहिती देण्यात आली आहे. परिणामी प्राध्यापकांना आत्मविश्वासाने विद्यार्थ्यांना ऑनलाईन अध्यापन करीत आहेत. त्यामुळे एकूणच दूरशिक्षण केंद्राची क्यूआर कोड सिस्टिम विद्यार्थ्यांसाठी आर्थिक आणि शैक्षणिकदृष्ट्या सोयीस्कर ठरणार आहे.