दूध हे आरोग्यासाठी लाभदायक असल्याचं आपण लहानपणापासून ऐकलं आहे. बाळाच्या सर्वांगीण विकासासाठी दुधापेक्षा दुसरं काही असूच शकत नाही. यामुळेच कदाचित दूध पाहून नाक मुरडणाऱया मुलांच्या आया त्यांना जबरदस्तीने दूध प्यायला लावतात. दुधात असे काही गुणतत्व आहेत, जे शरीराच्या सर्वांगीण विकासासाठी फायदेशीर ठरतात. दूध पिण्याची सवय तर चांगलीच आहे. मात्र, भेसळयुक्त दुधामुळे आरोग्यास धोका निर्माण होतो.
दुधात होणारी भेसळ ही अतिशय गंभीर बाब आहे. भेसळ करणारे दूध टिकून राहण्यासाठी त्यात खाण्याचा सोडा, धुण्याचा सोडा, कपडय़ांची पावडर, युरिया इ. पदार्थ मिसळतात. या भेसळीमुळे मानवी आरोग्यावर दुष्परिणाम होतात. भेसळ ओळखण्याबाबत माहिती करून घेऊ.
दूधाचे माप वाढविल्यामुळे त्यातील एस.एन.एफ. (घनपदार्थ विरहित स्निग्ध) कमी होते. हे टाळण्यासाठी त्यामध्ये लॅक्टोज, साखर, ग्लुकोज तसेच पीठ व मैदा अशा प्रकारचे स्टार्च; मीठ, युरिया, स्कीम मिल्क (दुधाची) पावडरची भेसळ करण्यात येते. ग्रामीण भागात शक्यतो प्रत्येक दिवशी एकाच वेळेला दूध संकलन केंद्रावर दूध संकलित केले जाते. अशा ठिकाणी दूध टिकून राहण्यासाठी त्यात खाण्याचा सोडा, धुण्याचा सोडा, कपडय़ांची पावडर, युरिया इत्यादींसारखे पदार्थ मिसळतात.

भेसळयुक्त दुधाचे दुष्परिणाम
भेसळयुक्त दूध मानवी आरोग्यास अपायकारक असते, त्यापासून असाध्य आजार उद्भवण्याची शक्यता असते जसे की – आय.सी.एम.आर.च्या अहवालानुसार भेसळयुक्त दुधाचे सेवन केल्यास क्षयरोग होऊ शकतो. युरियाची भेसळ केल्याने त्यातील नायट्रोजन या घटकामुळे मूत्रपिंड, हृदय व यकृत यासारखे अवयव निकामी होण्याची भीती असते, तसेच कॉस्टिक सोडय़ाच्या भेसळीमुळे दुधातील शरीरवाढीसाठी आवश्यक असणारे लायसिन हे अमिनो आम्ल शरीरास उपलब्ध होत नाही. परिणामी लहान मुलांच्या शरीरवाढीवर परिणाम होऊन शरीराची वाढ खुंटते. यामधील सोडिअमसारख्या घटकाचा मानवी शरीरावर परिणाम होऊन उच्च रक्तदाब व हृदय विकारासारखे आजार जडतात.
स्टार्चची भेसळ – अनेकदा नफा कमविण्यासाठी दुधात स्टार्च मिसळला जातो. ही भेसळ ओळखण्यासाठी 5 मिलीलीटर दुधात आयोडिनचे 2-3 थेंब टाकावेत. जर दुधाचा रंग फिकट निळा झाला तर समजावं की त्यात स्टार्च मिसळलेला आहे.
डिटर्जेंटची भेसळ – दुधात डिटर्जेंटची भेसळ आहे हे ओळखायचं असेल तर 10 मिलीलीटर दुधात तितकंच पाणी मिसळा. जर त्यात फेस तयार झाला तर समजावं की दुधात डिटर्जेंटची भेसळ आहे.
कृत्रिम दूध – कृत्रिम दुधाची चव कडू असते. तुम्ही जर त्या दुधात दोन बोटं बुडवली आणि ती एकमेकांवर चोळली तर साबणाप्रमाणे तुम्हाला स्पर्श जाणवतो. तर उकळल्यानंतर या दूधाचा रंग पिवळा पडतो.
यूरियाची भेसळ – अानेक दूध विपेते नफा कमविण्यासाठी दुधात युरिया मिसळतात. अशी भेसळ ओळखायची असेल तर 10 मिलीलीटर दुधात पोटेशियम कार्बेनाइटचे 5-6 थेंब टाकावे. जर दुधाचा रंग पिवळा पडला तर समजावे की त्यात यूरियाची भेसळ आहे.
ग्राहकांची मागणी पूर्ण करण्यासाठी आणि नफा कमविण्याच्या उद्देशाने अनेक विपेते दुधात कास्टिक सोडा, ग्लुकोज, पांढरा पेंट आणि रिफाइन तेलसुद्धा मिसळतात, जे आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक आहे.









