वार्ताहर / पंढरपूर
दूधाचे फॅट वाढविण्यासाठी पाण्यात व्हे परमिट पावडर, लॅक्टोज पावडर व रिफाइर्ड कॉटनसीड तेल (गोडतेल) टाकून सदर द्रावण मिक्सरवर फिरवून कृत्रिम भेसळ करीत असल्याचे शाम दूध संकलन केंद्र शेटफळ ता.पंढरपूर याठिकाणी अन्न व औषध प्रशासन विभागास २३ डिसेंबर २०१९ रोजी आढळून आले होते. याठिकाणी कारवाई करण्यात आली होती. याप्रकरणी दूध डेअरीचा चालक शहाजी गोपाळ साबळे (रा.शेटफळ ता.पंढरपूर जि.सोलापूर) यास अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रदीप राऊत यांनी २ लाख २५ हजारांचा दंड ठोठावला आहे.
कारवाईवेळी दूध संकलन केंद्रावर संकलन होणा-या ५०० लिटर दुधात सदर भेसळकरी दूध मिक्स करून दुधाची गुणवत्ता कृत्रिमरीत्या वाढवून जास्त नफेखोरी करण्याचा व्यवसाय सदर दूध संकलन केंद्रावर चालू असल्याचे दिसून आले होते. त्यामुळे सदर पेढीस तात्काळ व्यवसाय बंद करण्याचे आदेश देण्यात आले होते. दूधात भेसळ करण्यासाठी व्हे परमिट पावडर ९८ किलो, लॅक्टोज पावडर ९८ किलो, व १५ किलो गोडतेलचा साठा आढळून आला होता याप्रकरणी दूध चालकाविरोधात तिन कारवाया करुन अन्न व औषध प्रशासनासमोर सूनावणी झाली. यात डेअरी चालक शहाजी साबळे यास प्रत्येक कारवाईत ७५ हजारांचा दंड ठोठावला असून एकूण २ लाख २५ हजार दंड केला आहे.
Previous Articleपुणे विभागातील 3 लाख 85 हजार 985 रुग्ण कोरोनामुक्त!
Next Article रत्नागिरी जिल्ह्यात ६६ पॉझिटिव्ह









