प्रतिनिधी/धारबांदोडा
कुळे येथील जगप्रसिद्ध दूधसागर धबधबा पर्यटन हंगामाला स्थानिक आमदार तथा बांधकाममंत्री दीपक पाऊसकर यांच्या उपस्थितीत औपचारिक सुरुवात करण्यात आली. शनिवारी सकाळी कुळे येथे पर्यटकांच्या पहिल्या तुकडीचे गळय़ात पुष्पहार घालून स्वागत करण्यात आले. त्यानंतर मोले वन्यजीव विभागाचे फाटक उघडण्यात आले व सुमारे वीस जीप गाडय़ांना प्रवेश देण्यात आला.
दूधसागर धबधबा हे जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ आहे. येथे देशी व विदेशी पर्यटक मोठय़ा संख्येने भेट देतात. दूधसागर टूर ऑपरेटर्स असोसिएशनकडून या पर्यटकांचे योग्य प्रकारे स्वागत करुन त्यांना वाहतूक सेवा पुरविली जाते, असे बांधकाममंत्री दीपक पाऊसकर यावेळी म्हणाले.
गेल्या अनेक वर्षांपासून हा परिसर प्लास्टिक व कचरामुक्त व्हावा यासाठी जीप मालक व स्थानिक पंचायत प्रयत्न करीत आली आहे. कोरोनाच्या काळात पर्यटन व्यवसायाला मोठा फटका बसला. तरीही उपलब्ध झालेल्या व्यवसायाबद्दल येथील जीप मालक समाधानी आहेत. सरकार आपल्यापरीने या व्यावसायिकांना साहाय्य करीत आहे, असे मंत्री पाऊसकर म्हणाले. येथील प्रदूषण कमी करण्याच्या उद्देशाने व वन्यजीव विभागाच्या सर्व मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून रस्त्याचे काम हाती घेण्यात आले होते. एका बिगर सरकारी संस्थेने या रस्त्याच्या कामाला आक्षेप घेत उच्च न्यायालयात धाव घेतल्याने या आदेशाचे सरकार पालन करणार असून लवकरच राष्ट्रीय वन्यजीव विभागाचा ना हरकत दाखला मिळविला जाईल. त्यानंतरच त्या रस्त्याचे काम पुन्हा सुरु होणार असल्याचे त्यांनी सांगितले. हा रस्ता पूर्ण झाल्यास जीप गाडय़ांचे होणारे नुकसान कमी होऊन जीपमालकांना दिलासा मिळणार आहे. दूधसागर नदीवर सुमारे सत्तर लाख रुपये खर्चून कॉझवे बांधण्यात येणार असल्याची माहिती यावेळी मंत्री पाऊसकर यांनी दिली.
येथील दूधसागर पर्यटन व्यवसायाला चालना मिळावी व पर्यटकांसाठी साधन सुविधा निर्माण व्हाव्यात यासाठी बांधकाममंत्री सातत्याने प्रयत्न करीत आहेत. जीप मालकांनी ‘अतिथी देवो भवः’ याप्रमाणे येथील पर्यटकांचे स्वागत करावे असे धारबांदोडा जिल्हा पंचायत सदस्य सुधा गांवकर म्हणाल्या.
यावेळी कुळेचे सरपंच मनीष लांबोर, दूधसागर टूर ऑपरेटर्स असोशिएशनचे अध्यक्ष दिलीप मायरेकर, सचिव ब्रिजेश भगत, खजिनदार जानबा लांबोर, सदस्य ट्रिपोलो सौझा, नरेश शिगांवकर, कमलेश म्हार्दोळकर, बॅनी आझावेदो, सुकुर मास्कारेन्हास, मोले वन्यजीव विभागाचे वनाधिकारी सिद्धेश नाईक, सावर्डे भाजपा मंडळाचे अध्यक्ष विलास देसाई, पंचसदस्य निलेश सातपालकर आदी उपस्थित होते. सरंपच मनिष लांबोर यांचेही भाषण झाले.
दूधसागर टूर ऑपरेटर्स असोसिएशनला बांधकाममंत्री दीपक पाऊसकर यांचे मोलाचे सहकार्य लाभत असून असोशिएशनच्या प्रत्येक मागणीचा ते नेहमीच पाठपुरावा करतात. कुळे पंचायत तसेच राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर यांचेही या व्यवसायाला नेहमीच सहकार्य लाभत असल्याचे दिलीप मायरेकर आपल्या स्वागतपर भाषणात म्हणाले. ट्रिपोलो सौझा यांनी आभार मानले. सोमवार 4 ऑक्टोबरपासून पूर्ण क्षमतेने पर्यटन हंगामाला सुरुवात होणार आहे.









