दुहेरी लसवंताना लोकल प्रवास स्वातंत्र्य या निर्णयाचे स्वागत झाले असले तरी यातून सरकारचीच खरी कसोटी लागणार आहे. लसीकरण कालावधीची मर्यादा आखून न घेतल्यास लोकल प्रवाशांमध्ये निराशेचा कल्लोळच उठण्याची अधिक शक्यता आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्या दिवशी दुहेरी लसवंतांना लोकल प्रवास खुला करण्याचा निर्णय घेतला त्या दिवसापासून लसीकरण पेंद्रांवर गर्दी वाढू लागली आहे. या निर्णयाची ही जमेची बाजू असली तरी लसीची अनुपलब्धता लस इच्छुकांच्या मनात निराशा निर्माण करत आहे. मुंबईतील लस पेंद्रांवर पहाटेपासून रांगा लागत आहेत. यात कामाला जाणारे म्हणजेच लोकल व्यतिरिक्त इतर वाहनांनी कामाला जाणारा वर्ग अधिक आहे. त्यामुळेच लोकल प्रवास खुला होण्याची सर्व आतुरतेने वाट पाहत होते. त्याची प्रतीक्षा 15 ऑगस्टपासून संपली. सुरुवातीला लस घेण्यास उत्सुक नसलेलेदेखील लोकल प्रवास करण्यास परवानगी मिळेल या हेतूने लस पेंद्रांवर पोहचत आहेत. मात्र अटीप्रमाणे 2 डोस पूर्ण होणाऱयांची संख्या फार कमी असून आज पहिला डोस घेतलेल्या लोकांना 84 अधिक 15 असे मिळून 99 दिवसांची प्रतीक्षा करावी लागणार आहे. मुंबईतील दोन डोस घेतलेल्या लाभार्थ्यांच्या आकडेवारीवर नजर फिरवल्यास दुहेरी डोस आणि लोकल प्रवास हा निर्णय पोकळ असल्याचा अनुभव येतो.
शनिवारपर्यंत मुंबईत एकूण 19,91,554 जणांना 2 डोस देण्यात आले. यात आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन वर्कर मिळून 2,98,948 जणांनी दोन डोस घेतले आहेत. तर 60 वर्षावरील 6,63,089 जणांनी 2 डोस घेतले आहेत. 45 ते 60 वर्षापर्यंतच्या 8,46,562 नागरिकांनी 2 डोस घेतले आहेत. 18 ते 44 वर्षापर्यंत 1,64,251 जणांनी दोन डोस घेतले आहेत. या स्थितीत आरोग्य कर्मचारी आणि फ्रंट लाईन वर्कर, 45 ते 60 वर्षापर्यंतचे नागरिक आणि 18 ते 44 वर्षापर्यंतचे नागरिक घराबाहेर पडणारा वर्ग मानल्यास आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर आणि शासकीय कर्मचाऱयांना रेल्वे प्रवासाला अनुमती आधीच देण्यात आली होती. त्यामुळे उर्वरित वर्गातील दोन्ही लस लाभार्थ्यांची संख्या 13,09,761 एवढीच भरते. (हे शनिवारपर्यंत) यात ही 13 लाखातून जर ही संख्या वजा केल्यास 2 डोस घेऊन 15
ऑगस्टपासून रेल्वे प्रवासास मुभा दिलेले आणखी कमी होऊ शकतात. सध्या एकूण 20 टक्के मुंबईकरांचे लसीकरण झाले असे मानल्यास प्रत्यक्षात यातील लोकल प्रवास लाभार्थ्यांची टक्केवारी बिलकुल घटणार. यात महाराष्ट्रातील जिल्हानिहाय आकडेवारी पाहिल्यास मुंबई शहर दोन डोस पूर्ण करण्यात आघाडीवर असल्याचे समजते. मात्र यातील लोकल प्रवास लाभार्थी नक्कीच कमी आहेत.
स्वातंत्र्यदिनापासून दुहेरी लसवंताना लोकल प्रवास खुला करण्याचा निर्णय नक्कीच स्वागतार्ह आहे. मात्र ही साखरमिश्रित औषध असल्याप्रमाणे गळय़ाखाली उतरण्यास कठीण आहे. हा निर्णय घोषित केल्याने लस पेंद्रांवर गर्दी उसळल्याचे चित्र आहे. लस टाळणारेदेखील लोकल प्रवासाच्या हेतूने किमान एका डोससाठी तरी लस पेंद्राकडे वळले. मुंबईत शनिवारी 2,19,727 लसीकरण झाले असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले. मुंबईत इतक्या मोठय़ा प्रमाणात लसीकरण होण्याची ही पहिलीच घटना असली तरी यातील लोकल प्रवास इच्छुकाना त्या दिवसापासून 99 दिवसांची प्रतीक्षा करावी लागणार. दरम्यान गेल्या 15 दिवसात मुंबईतील लसीकरण 65 टक्क्यांनी घटले होते. हे 15 दिवसांची घटण्याची टक्केवारी पुढील 15 दिवसात भरून येईलच असे नाही. दुहेरी लसवंतांमध्ये महाराष्ट्र आघाडीवर त्यात मुंबई खूपच आघाडीवर आहे. मात्र ही आघाडी सकारात्मक बातम्या करण्याइतपत मर्यादित असल्याचे लोकल प्रवास खुला केल्याचे निर्णयातून स्पष्ट होत आहे. मुंबई महापालिकेची लस देण्याची क्षमता मोठी असून मुंबईला विशेष स्वरूपात लस पुरवठा होत नसल्याचेच समोर येत आहे. जानेवारीपासून 13 ऑगस्टपर्यंत मुंबईला एकूण 51 लाख 60 हजार 60 डोस मिळाले. यात सर्वाधिक जुलै महिन्यात तर मे महिन्यात सर्वात कमी लस पुरवठा झाला आहे. अशा एकूण स्थिती 100 टक्के दुहेरी लसीकरण करण्यात हेही वर्ष जाण्याची सर्वाधिक शक्यता आहे.
दरम्यान दुहेरी लसवंतांना लोकल प्रवास या मुद्याला आव्हान देणारी याचिका न्यायालयात दाखल करण्यात आली. लोकल प्रवाशांची बाजू मांडणारी ही याचिका आहे. त्यासाठी आंदोलन उभारण्याची तयारी होत आहे. याचिकाकर्ते फिरोझ मिठीबोरवाला यांनी लोकल प्रवासासाठी दुहेरी लसीकरणाची अट हीच मुळात संविधान विरोधात असल्याचे याचिकेत म्हटले आहे. मिझोराम, नागालँड उच्च न्यायालयात लसीकरण ऐच्छिक असल्याचे घोषित झाले असताना लोकल प्रवासासाठी त्याची अट का असा सवाल या याचिकेत आहे. शहरातील प्रवास प्रश्नाला लागून या सवालाप्रमाणे अनेक सवाल उपस्थित करण्यात येत आहेत. या सवालांच्या पेंद्रस्थानी मात्र लसीकरण, कोरोना आणि सार्वजनिक प्रवास हे मुद्दे आहेत. त्यामुळेच आगामी काळात लोकल प्रवासाला दुहेरी लसीकरण ही अट राहिलच का यावर साशंकता निर्माण होत आहे. गर्दी असूनही बस प्रवाशांना वेगळा नियम का? मुंबई बाहेर रेल्वेने जाणाऱयांसाठी दुहेरी लसीची अट का नाही? दाट वस्तीची मुंबई म्हणून ओळखली जात असली तरी ही आर्थिक राजधानी असल्याने सार्वजनिक प्रवासासाठी एवढे कडक नियम का? बाहेरून मुंबईत येणाऱयांची तपासणी का सैलावली? दुहेरी डोसची अट ठेवावयाची असल्यास मुंबईला त्या गतीने लस पुरवठा का नाही? असे एक ना अनेक प्रश्न मुंबईकर उपस्थित करत आहेत. त्यामुळे तूर्तास दुहेरी लसावंताना लोकल प्रवास स्वातंत्र्य या निर्णयाचे स्वागत झाले असले तरी ते पूर्ण करताना सरकारचीच खरी कसोटी लागणार असल्याचे चित्र आहे.
राम खांदारे







