ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
देशातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेसाठी डेल्टा व्हेरिएंट जबाबदार असल्याचा दावा तज्ज्ञांनी संशोधनाच्या आधारे केला आहे. तसेच डेल्टा हा अल्फा व्हेरिएंटपेक्षा जास्त संक्रमणकारक असल्याचेही ‘इन्साकोग’ने केलेल्या संशोधनात म्हटले आहे.
कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटची देशात आतापर्यंत 12 हजारहून अधिक प्रकरणे नोंदविली गेली आहेत. डेल्टा व्हेरिएंट अल्फापेक्षा जास्त धोकादायक आहे डेल्टा (बी 1.617.2) अल्फापेक्षा (बी.1.1.7) 50 टक्के अधिक वेगाने पसरतो. विशेष म्हणजे लस घेतल्यानंतरही कोरोनाच्या या प्रकाराची लागण होण्याची शक्यता खूप जास्त असते. दुसरीकडे, कोरोनाच्या अल्फा व्हेरिएंटचा विचार केला तर लसीकरण झाल्यानंतर एकाही व्यक्तीला कोरोनाची लागण झालेली नाही.
इन्साकोग हा भारतातील जीनोम सिक्वेन्सिंग प्रयोगशाळांचा संघ आहे. इन्साकोगने केलेल्या या संशोधनाची नॅशनल सेंटर फॉर डिसीजकडून माहिती देण्यात आली आहे.









