बरोबरीनंतर शूटआऊटमध्ये 3-1 गोल्सनी भारताची बाजी
वृत्तसंस्था/ भुवनेश्वर
भारताने एफआयएच प्रो लीगमध्ये स्वप्नवत पदार्पण करताना जागतिक क्रमवारीत तिसऱया क्रमांकावर असणाऱया नेदरलँड्सचा शूटआऊटमध्ये 3-1 असा पराभव करून सलग दुसरा विजय मिळविला. निर्धारित वेळेत 3-3 अशी बरोबरी झाली होती.
जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानावर असणाऱया भारताने पहिल्या सामन्यात शनिवारी 5-2 असा पराभव केला होता. दोन्ही सामने जिंकल्याने या लीगच्या गुणतक्त्यात भारताने 5 गुणांसह पहिले स्थान मिळविले आहे. मात्र निर्धारित वेळे 3-3 अशी बरोबरी झाल्याने भारताला एक गुण गमवावा लागला. आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनने या लीगसाठी नवे नियम लागू केले असून यातील प्रत्येक सामना निकाली करावा लागतो. सामना अनिर्णीत राहिल्यास शूटआऊट घेतले जाते आणि जो संघ जिंकेल त्याला दोन गुण तर हरणाऱया संघाला एक गुण दिला जातो.
निर्धारित वेळेत मिंक व्हान डर वीडेनने (23 वे मिनिट) पेनल्टी कॉर्नरवर तर जेरॉन हर्ट्झबर्गर (26) व बियॉन केलेमन (27) यांनी नेदरलँड्सतर्फे मैदानी गोल नोंदवले. ललित उपाध्याय (25), मनदीप सिंग (51) व रुपिंदर पाल सिंग (55) यांनी भारताचे गोल नोंदवले. शूटआऊटमध्ये विवेक सागर प्रसाद, आकाशदीप सिंग, गुर्जंत सिंग यांनी भारताचे गोल केले तर हरमनप्रीत व रुपिंदर पाल यांचे गोल हुकले. नेदरलँड्सच्या मिर्को प्रुईजरने एकमेव गोल नोंदवला तर ग्लेन श्कुरमन, थिएरी ब्रिंकमन, जेरॉन हर्ट्झबर्गर यांना गोल नोंदवता आले नाहीत. भारताने या सामन्यात प्रारंभापासून वर्चस्व राखले होते. पण पहिले यश मिळविले ते नेदरलँड्सने. मध्यंतरापर्यंत त्यांनी भारतावर 3-1 अशी आघाडी घेतली होती. उत्तरार्धात भारताने दोन गोल नोंदवून बरोबरी साधली होती.
भारताची पुढील लढत बेल्जियमविरुद्ध 8 व 9 फेब्रुवारी रोजी होईल. त्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध 22 व 23 फेब्रुवारी रोजी दोन सामने होतील. या लढती भारतात होणार असून त्यानंतर भारतीय संघ जर्मनीला प्रयाण करेल. एप्रिल 25 व 26 रोजी जर्मनीविरुद्ध आणि 2 व 3 मे रोजी इंग्लंडविरुद्ध त्यांचे सामने होतील. त्यानंतर मायदेशात न्यूझीलंडविरुद्ध 23 व 24 मे रोजी सामने होतील आणि मग भारतीय संघ अर्जेन्टिनाविरुद्धच्या लढती 5 व 6 जून रोजी खेळण्यासाठी त्यांच्या देशाकडे रवाना होणार आहे.