वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतामध्ये विविध राज्यांमध्ये कोरोनाची दुसरी लाट मोठय़ा प्रमाणात पसरताना दिसते आहे. या लाटेमुळे सर्वसामान्यांसह व्यावसायिक पुरते घाबरून गेले आहेत. तरीही याखेपेस उद्योग क्षेत्राने मात्र आता आपली तयारी अधिक नेटाने केली असल्याचे समजते. उद्योग क्षेत्र कोरोना लाटेचा सामना करण्यासाठी सज्ज असल्याचे सांगण्यात येत आहे.
देशाची अर्थव्यवस्था रुळावर आली असून यामध्ये उद्योगांची भूमिका नेहमीच अग्रेसर राहिली आहे. मागच्या वेळेच्या कोरोना लाटेमध्ये उद्योग बंद केले गेल्याने कोटय़ावधीचे नुकसान विविध कंपन्यांना झेलावे लागले होते. पण आता मात्र लॉकडाऊन असले तरी उद्योग आणि महत्त्वाचे व्यवसाय यांना व्यवसाय सुरू ठेवण्यास मुभा देण्यात आली असल्याने त्यांच्या व्यवसायावर कमी परिणाम होणार आहे.
सुनीलकांत मुंजाल, हर्षपती सिंघानिया आणि संजय किर्लोस्कर यासारख्या उद्योजकांनी ऑल इंडिया मॅनेजमेंट असोसिएशनच्या एका कार्यक्रमामध्ये येणाऱया काळात उद्योग क्षेत्र कोरोनाचा उत्तमपणे सामना करू शकणार असल्याचे म्हटले आहे. यावर साऱयांचे एकमत झाले आहे. मागच्या वेळेच्या तुलनेपेक्षा यावेळी कोरोनाचा सामना चांगल्या पद्धतीने केला जाईल असा विश्वास उद्योजकांनी वर्तविला आहे. आताच्या काळामध्ये कंपन्या आपल्या क्षमतेचा पुरेपूर वापर करीत आहेत. त्याचप्रमाणे योग्य त्यावेळी गुंतवणूक करण्याचीही अपेक्षा आहे. आजही अनेक क्षेत्रे व कंपन्या संकटाचा सामना करत असून त्यांच्याकडून गुंतवणूकीची अपेक्षा करता येत नाही, असेही उद्योजकांनी म्हटले आहे.









