वृत्तसंस्था / मुंबई
चालू आठवडय़ाचा प्रारंभ शेअर बाजाराने तेजीसोबत केला आहे. सलग दुसऱया दिवशी मंगळवारी अमेरिकेतील निवडणुकीच्या पार्श्वभूमीचे सकारात्मक पडसाद देशातील भांडवली बाजारात कायम राहिले आहेत. दिवसअखेर सेन्सेक्स 503.55 अंकांनी मजबूत होत बंद झाला.
प्रमुख क्षेत्राच्या कामगिरीत दिवसभरात बँकिंग, धातू आणि वाहन क्षेत्रातील समभागांनी उच्चांकी मजबूती नोंदवल्याने सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्हीमध्ये उत्साहाचे वातावरण राहिले होते. दिवसअखेर सेन्सेक्स 503.55 अंकांनी वधारुन निर्देशांक 40,261.13 वर बंद झाला. दुसऱया बाजूला निफ्टी 144.35 अंकांसह 11,813.50 वर स्थिरावला आहे.
निफ्टीमध्ये बँकेचा निर्देशांक 790 अंकांनी मजबूत स्थितीत राहिला असून धातू क्षेत्राच्या निर्देशांकात 2.24 टक्के आणि वाहन क्षेत्राच्या निर्देशांकात 1.51 टक्केची तेजी पहावयास मिळाली आहे.
सेन्सेक्समध्ये सर्वाधिक सहा टक्क्यांची तेजी नोंदवत आयसीआयसीआय बँक अव्वल स्थानी राहिली आहे. स्टेट बँक, एचडीएफसी, पॉवर ग्रिड कॉर्प, सन फार्मा, इंडसइंड बँक, टायटन, बजाज ऑटो आणि एचडीएफसी बँक यांचे समभाग मात्र नफ्यात राहिले आहेत. विरुद्ध बाजूला मात्र एनटीपीसी, रिलायन्स इंडस्ट्रीज, नेस्ले इंडिया, एचसीएल टेक आणि इन्फोसिस यांचे समभाग नुकसानीसह बंद झाले आहेत.
जागतिक पातळीवरील संकेत
अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाची माळ डोनाल्ड ट्रम्प की ज्यो बायडन यांच्यापैकी कोणाच्या गळय़ात पडणार याची उत्सुकता सध्या अमेरिकेसह जगातील सर्वच देशांना लागून राहिली आहे. याचा सकारात्मक लाभ म्हणून भारतासह जगातील प्रमुख भांडवली बाजारात तेजीचे वातावरण राहिले होते. यामध्ये शांघाय, हाँगकाँग, सोल आणि टोकीयो आदी बाजार तेजीसह बंद झाले आहेत.आंतरराष्ट्रीय बाजारात बेंट कच्च्या तेलाचे भाव 3.31 टक्क्यांनी वधारुन 40.26 डॉलर प्रति बॅरेलवर राहिले.









