वार्ताहर/ कराड
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी शासनाने शनिवार व रविवारी जाहीर केलेल्या विकेंड लॉकडाऊनला कराडकरांनी प्रतिसाद दिल्याने शहरात 100 टक्के लॉकडाऊन शयस्वी झाला. कुठेही पोलीस बळाचा वापर न होताही शनिवार व रविवार दोन्ही दिवस शहरात सन्नाटा पाहावयास मिळाला. दवाखाने व औषधांची दुकाने वगळता अत्यावश्यक सेवेतील बहुतांश दुकाने रविवारीही बंदच राहिली.
शासनाने जाहीर केल्यानुसार शनिवार व रविवार दोन दिवस कडकडीत विकेंड लॉकडाऊन पाळण्यात आला. शहरासह तालुक्यात कोरोनाचा प्रसार वेगाने होत असल्याने कुठेही पोलीस बळाचा वापर न करताही नागरीकांनी स्वयंशिस्तीने लॉकडाऊन यशस्वी केला. पोलिस प्रशासनाने शहरातील अंतर्गत रस्त्यांसह प्रमुख रस्त्यांवर बॅरीकेटींग करून रस्त्यावरील वाहतूक नियंत्रित केली आहे. शासनाने अत्यावश्यक सेवेतील दुकाने चालू ठेवण्यास परवानगी दिली असली तरी अपवाद वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली. दवाखाने व औषधांची दुकाने मात्र सुरळीत सुरू होती.
शनिवार पासूनच प्रवासी नसल्याने कराड आगारातील सर्व एस.टी. सेवा बंद ठेवण्यात आली आहे. रविवारीही दिवसभर एस.टी.सेवा बंद ठेवण्यात आली. दोन दिवसांपासून बंद असलेली लसीकरण मोहीम रविवारी पुन्हा सुरू झाल्याने उपजिल्हा रूग्णालय परिसरात नागरिकांची वर्दळ सुरू होती. तर मंडई परिसरात काही ठिकाणी भाजी विक्रेत्यांनी दुकाने लावली होती. तर मटण मार्केटमधील दुकाने सुरू असल्याने या परिसरातही काही प्रमाणात वर्दळ सुरू होती.








