प्रतिनिधी/ सातारा
सातार जिल्हय़ात आढळलेल्या कोरोनाबाधितांचा आकडा 11 असून आत बाधितांची संख्या थांबून कोरोनामुक्तांचा आकडा वाढावा, यासाठी साऱयांनी मनोमन प्रार्थना सुरू केली आहे. 11 जण बाधित, 2 बळी तर एक जण जिल्हय़ात कोरोनामुक्त आहे. कराड तालुक्यातील तांबवे गावचा युवक जिल्हय़ातला तिसरा बाधित होता. त्याला दाखल करून गुरूवारी 14 दिवस झाल्याने त्याचा अहवाल पुण्याला पाठवला आहे. त्याचीच प्रतीक्षा आहे. कराडच्या कृष्णामध्ये उपचार घेत असलेल्या युवकाची कोरोनाझुंज यशस्वी ठरण्याकडे सारं काही वेधलं गेलं आहे. दरम्यान, शुक्रवारी साताऱयात 8 अहवाल निगेटिव्ह आले तर साताऱयात 9, कृष्णा कराड येथे 8, कराड उपजिल्हा येथे 7 जणांना विलगीकरण कक्षांत दाखल करण्यात आले आहे.
कोरोनाची आकडेवारी मंदावल्याची सुखद भावना साऱया देशभर निर्माण झाली आहे. जिल्हय़ात हा आकडा 11 असून दोन दिवसांत त्यात सुदैवाने वाढ झालेली नाही. आजवर 610 जणांचे अहवाल तपासण्यात आले असून 445 जण निगेटिव्ह आले आहेत. सध्या 146 जणांचे अहवाल प्रलंबित असून त्यातील बहूतेक जण बुधवारी 4 बाधित सापडले त्यांच्यासंदर्भातले आहेत. शुक्रवारी 8 जणांची अहवाल निगेटिव्ह आले असले तरी तमाम जिल्हय़ावासीयांना तांबवेतील त्या युवकाच्या अहवालाची प्रतिक्षा आहे.
मुंबईच्या कोरपखैरने भागात राहणारा व जहाजांशी संबंधित नोकरी करणाऱया मुळ तांबव्याच्या युवकाला कोराना असल्याचे कळले, त्याला गुरूवारी 14 दिवस झाले. राष्ट्रीय आरोग्य विषयक नियमांनुसार 14 व्या दिवशी त्याच्या घश्यातील स्त्रावांचा अहवाल पुण्याला पाठवला असून तो शुक्रवारी उशियापर्यंत आला नव्हता. शनिवारी तो निगेटिव्हच असावा म्हणून भयाण भितीच्या तणावाखाली असलेल्या जिल्हावासियांनी आपआपल्या परिने प्रार्थना, दुवा, मन्नत मागायला सुरूवात केली आहे.