बीसीसीआय-तामिळनाडू क्रिकेट संघटनेचा निर्णय, पत्रकार कक्षही उघडणार
चेन्नई / वृत्तसंस्था
भारत-इंग्लंड यांच्यात एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळवल्या जाणाऱया दुसऱया कसोटी सामन्यासाठी 50 टक्के चाहत्यांना प्रवेश दिला जाईल, अशी घोषणा बीसीसीआय व तामिळनाडू क्रिकेट संघटनेने सोमवारी केली. कोव्हिड-19 संबंधित नवे दिशानिर्देश, सूचना विचारात घेत तामिळनाडू संघटनेच्या सदस्यांनी चर्चा केली आणि त्यानंतर या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले. सध्या तामिळनाडू प्रशासनाने स्टेडियममधील सर्व क्रीडा स्पर्धांकरिता 50 टक्के चाहत्यांना प्रवेश देण्यास संमती दिली आहे.
‘केंद्राने जारी केलेल्या सूचनावलीचा विचार करुन आम्ही 50 टक्के चाहत्यांना प्रवेश देत आहोत’, असे तामिळनाडू संघटनेच्या पदाधिकाऱयाने यावेळी नमूद केले. एमए चिदंबरम स्टेडियमची प्रेक्षकक्षमता 50 हजार इतकी आहे. भारत-इंग्लंड मालिकेतील पहिली कसोटी शुक्रवारपासून तर दुसरी कसोटी दि. 13 फेब्रुवारीपासून खेळवली जाणार आहे. तिसरी व चौथी कसोटी अहमदाबादमध्ये होत असून तेथे चाहत्यांना प्रवेश दिला जाईल, असे यापूर्वीच जाहीर केले गेले आहे.
प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना दोन्ही कसोटी सामन्यांसाठी प्रवेश दिला जाईल. मात्र, पत्रकार परिषद आभासी पद्धतीनेच होतील, असे यावेळी पदाधिकाऱयांनी स्पष्ट केले. बीसीसीआय व तामिळनाडू क्रिकेट संघटनेने यापूर्वी पहिले दोन्ही सामने प्रेक्षकांविना खेळवले जातील, असे जाहीर केले होते. मात्र, पुढे गृह मंत्रालयाने नवे दिशानिर्देश जाहीर केल्यानंतर हा बदल केला गेला.









