वृत्तसंस्था / चेन्नई
इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीवर यजमान भारताने पूर्ण नियंत्रण मिळविलेअसून दुसऱया दिवशीअखेर भारताने दुसऱया डावात 1 बाद 54 धावा जमवित इंग्लंडवर एकूण 249 धावांची आघाडी मिळविली आहे. भारताने पहिल्या डावात 329 धावा जमविल्यानंतर आर. अश्विनच्या भेदक फिरकीसमोर इंग्लंडचा पहिला केवळ 134 धावांत आटोपला. दुसरा दिवस गोलंदाजांनी गाजविताना एकूण 15 बळी मिळविले, त्यापैकी अश्विनने 5 बळी टिपले.
6 बाद 300 या धावसंख्येवरून भारताने दुसऱया दिवसाच्या खेळाला पुढे प्रारंभ केला आणि केवळ 29 धावांची भर घातल्यानंतर पहिला डाव 329 धावांत संपुष्टात आला. यष्टिरक्षक फलंदाज रिषभ पंतने आक्रमक खेळ करीत नाबाद 58 धावा फटकावल्या. इंग्लंडचा ऑफस्पिनर मोईन अलीने 4 बळी टिपले, पण यासाठी त्याला 128 धावा मोजाव्या लागल्या. याशिवाय ओली स्टोनने 3, जॅक लीचने 2, जो रूटने एक बळी मिळविला. भारताने दिवसातील दुसऱयाच षटकांत तीन चेंडूत दोन बळी गमविले. विशेष म्हणजे इंग्लंडच्या गोलंदाजांनी 95.5 षटकांत भारताला एकही अवांतर दिली नाही. एकही अवांतर धाव न देण्याची कसोटी इतिहासातील ही केवळ चौथी वेळ आहे.
त्यानंतर खराब होत चाललेल्या खेळपट्टीचा लाभ घेत अश्विन व त्याच्या सहकारी गोलंदाजांनी इंग्लंडचा डाव केवळ 134 धावांत गुंडाळून भारताला 195 धावांची आघाडी मिळवून दिली. अश्विनने ब्रॉडचा त्रिफळा उडवित मालिकेत दुसऱयांदा पाच बळी मिळविण्याचा पराक्रम केला. त्याने 43 धावांत 5 बळी मिळविले. पाच किंवा त्याहून जास्त बळी मिळविण्याची त्याची ही 29 वी वेळ आहे. याशिवाय इशांत शर्मा व अक्षर पटेल यांनी प्रत्येकी 2 तर सिराजने एक बळी मिळविला. त्यानंतर भारताने दिवसअखेर शुभमन गिलचा बळी गमवित 18 षटकांत 1 बाद 54 धावा जमविल्या होत्या. पहिल्या डावातील शतकवीर रोहित शर्मा 25 तर चेतेश्वर पुजारा 7 धावांवर खेळत होते.
दिवसभरात 15 बळी पडले असले तरी खेळपट्टी खेळण्यायोग्य नव्हती, असे अजिबात नाही. रोहित व रहाणे यांनी पहिल्या दिवशी ते दाखवून दिले आहे. दुसऱया दिवशीही रोहितने सहजतेने फलंदाजी करीत 62 चेंडूत नाबाद 25 धावा जमविल्या. यष्टिरक्षक बेन फोक्सचा (नाबाद 42) अपवाद वगळता इंग्लंडच्या फलंदाजांजवळ भारतीय गोलंदाजीच्या आव्हानाला उत्तर नव्हते, असेच दिसून आले. पहिल्या कसोटीत इंग्लंडच्या फलंदाजांनी फिरकीविरुद्ध स्वीपचा सढळ वापर करीत धावा जमविल्या होत्या. पण या कसोटीत याच फटक्याने त्यांना दगा दिला. कर्णधार रूटही याच फटक्याचा बळी ठरला.
या कसोटीत आतापर्यंत सर्व गोष्टी भारताच्या मनासारख्या घडल्या असून नाणेफेक जिंकल्यानंतर फलंदाजांनी समाधानकारक धावसंख्याही फलकावर लावली आहे. त्यानंतर इंग्लंडचा पहिला डाव माफक धावसंख्येत गुंडाळून मोठी आघाडी घेत मालिकेत बरोबरी साधण्याच्या दिशेने आगेकूच केली आहे. सकाळच्या सत्रात इंग्लंडचे चार बळी मिळविल्यानंतर दुसऱया सत्रात आणखी चार बळी मिळवित इंग्लंडची स्थिती 8 बाद 106 अशी केली होती. 39 व्या षटकात मोहम्मद सिराजला गोलंदाजी दिल्यानंतर त्याने पहिल्याच चेंडूवर बळी मिळविला. पदार्पण करणारा अक्षर पटेल तसेच इशांत शर्मा यांनी अश्विनला पूरक साथ दिली. अश्विनने उपाहारानंतरच्या सहाव्या षटकांत बेन स्टोक्सचा (18) मोठा अडसर दूर केला. ओली पोप (22) स्पिनर्सविरुद्ध व्यवस्थित खेळत होता. पण त्याने सिराजचा लेगसाईडला ग्लाईड केलेला चेंडू पंतने सूर मारत टिपल्याने त्याची खेळी संपुष्टात आली. सिराजचा हा भारतात मिळविलेला पहिला कसोटी बळी आहे. यष्टिरक्षणात चमक दाखविलेल्या फोक्सने फलंदाजीतही तशीच चमक दाखविली. मोईन अली आठव्या क्रमांकावर आला. अक्षर पटेलच्या चेंडूवर उडालेला झेल पंतच्या मांडीला लागून उडाल्यावर रहाणेने पुढे सूर मारत झेल पूर्ण केला.
रविचंद्रन अश्विनचा विक्रम, हरभजनला मागे टाकले
ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनने हरभजन सिंगला मागे टाकत मायदेशात सर्वाधिक बळी मिळविणारा दुसऱया क्रमांकाचा गोलंदाज होण्याचा विक्रम केला. हरभजनने 28.76 धावांच्या सरासरीने 265 बळी मिळविले होते. स्टोक्सला बाद करीत अश्विनने 266 वा बळी मिळवित त्याचा हा विक्रम मागे टाकला. त्याने 22.67 धावांच्या सरासरीने हे बळी मिळविले आहेत. भारतामध्ये सर्वाधिक बळी टिपण्याचा विक्रम अनिल कुंबळेच्या नावावर असून त्याने 24.88 च्या सरासरीने मायदेशात 350 बळी मिळविले आहेत. याशिवाय सर्वाधिक 619 बळी मिळविण्याचा भारतीय विक्रमही कुंबळेच्या नावावर आहे. दुसऱया क्रमांकावरील कपिलदेवने 434, तिसऱया स्थानावरील हरभजन सिंगने 417 बळी मिळविले आहेत. अश्विन 391 बळी मिळवित चौथ्या स्थानावर आहे.
पुजाराऐवजी अगरवालने केले क्षेत्ररक्षण
पहिल्या दिवशी फलंदाजी करताना चेतेश्वर पुजाराच्या उजव्या हाताला चेंडू लागल्यामुळे दुसऱया दिवशी इंग्लंडच्या डावात तो क्षेत्ररक्षणास उतरला नव्हता. पहिल्या डावात त्याने 58 चेंडूत 21 धावा जमविल्या होत्या. त्याच्याऐवजी मयांक अगरवाल क्षेत्ररक्षणासाठी मैदानात उतरला होता. मात्र इंग्लंडचा पहिला डाव लवकर आटोपल्यानंतर भारताला फलंदाजीस उतरावे लागले आणि गिल लवकर बाद झाल्यानंतर मात्र त्याला फलंदाजीस यावे लागले असून तो 7 धावांवर खेळत आहे.
संक्षिप्त धावफलक ः भारत प.डाव 95.5 षटकांत सर्व बाद 329 ः रोहित शर्मा 161, गिल 0, कोहली 0, पुजारा 21, रहाणे 67, पंत नाबाद 58 (77 चेंडूत 7 चौकार, 3 षटकार), अश्विन 13, अक्षर पटेल 5, इशांत शर्मा 0, कुलदीप 0, सिराज 4, अवांतर 0. गोलंदाजी ः मोईन अली 4-128, ओली स्टोन 3-47, जॅक लीच 2-78, रूट 1-23. इंग्लंड प.डाव 59.5 षटकांत सर्व बाद 134 ः बर्न्स 0, सिबली 16, लॉरेन्स 9, रूट 6, स्टोक्स 18, ओली पोप 22, बेन फोक्स नाबाद 42 (107 चेंडूत 4 चौकार), मोईन अली 6, स्टोन 1, लीच 5, ब्रॉड 0, अवांतर 9. गोलंदाजी ः अश्विन 5-43, अक्षर पटेल 2-40, इशांत 2-22, सिराज 1-5. भारत दु.डाव 18 षटकांत 1 बाद 54 ः गिल 14 (28 चेंडूत 1 षटकार), रोहित शर्मा खेळत आहे 25 (62 चेंडूत 2 चौकार, 1 षटकार), पुजारा खेळत आहे 7, अवांतर 8. गोलंदाजी ः लीच 1-19, मोईन 0-19.









