बोल्ट-वॅग्नरचे प्रत्येकी 3 बळी, निकोल्स सामनावीर, जेमीसन मालिकावीर
वृत्तसंस्था/ वेलिंग्टन
न्यूझीलंडने दुसऱया कसोटीत विंडीजवर एक डाव 12 धावांनी विजय मिळवित दोन सामन्यांची मालिका 2-0 अशी जिंकत कसोटी मानांकनातील दुसरे स्थान कायम राखले. काईल जेमीसनला मालिकावीर तर हेन्री निकोल्सला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
या कसोटीत न्यूझीलंडने पहिल्या डावात 460 धावा जमविल्यानंतर विंडीजला पहिल्या डावात 131 धावांत गुंडाळून फॉलोऑन दिला होता. त्यानंतर विंडीजने दुसऱया डावात सुधारित प्रदर्शन करीत तिसऱया दिवशीअखेर 6 बाद 244 धावा जमवित पराभव लांबवला होता. पण चौथ्या दिवशी त्यांच्या उर्वरित गडय़ांनी आणखी 73 धावांची भर घातल्यानंतर 317 धावांत त्यांचा डाव आटोपला. या विजयानंतर न्यूझीलंडचे 116 गुण झाले असून ऑस्ट्रेलियापेक्षा (116) ते केवळ किंचित फरकाने मागे आहेत. याशिवाय मायदेशातील सलग 15 व्या कसोटीत ते अपराजित राहिले आहेत. आयसीसी विश्व कसोटी चॅम्पियनशिपमध्येही त्यांना अंतिम फेरीत स्थान मिळविण्याची आशा करता येणार आहे. या चॅम्पियनशिपमध्ये ते सध्या ऑस्ट्रेलिया व भारतानंतर तिसऱया स्थानावर आहेत.
विल्यम्सनने या सामन्यातून माघार घेतल्यानंतर संघाने कामगिरी उंचावत हा विजय मिळविला असल्याचे हंगामी कर्णधार टॉम लॅथम म्हणाला. हेन्री निकोल्स फॉर्म मिळविण्यासाठी झगडत होता. पण त्यावर मात करीत त्याने कारकिर्दीतील 174 धावांची सर्वोच्च वैयक्तिक कामगिरी करीत संघाच्या विजयाचा पाया रोवला. केवळ चौथ्या कसोटीत खेळणाऱया जेमीसनने पहिल्या डावात 5 आणि दुसऱया डावात 2 बळी मिळवित मालिकावीराचा बहुमानही मिळविला. याशिवाय टिम साऊदीने सामन्यात 7 बळी मिळविले. याआधी पहिली कसोटीही न्यूझीलंडने डावाने जिंकली होती. आपल्या सहकाऱयांनी एकसंध कामगिरी केल्यानेच हे यश मिळविता आले, असेही लॅथम म्हणाला.
विंडीजसाठी हा दौरा निराशाजनक ठरला असून दोन्ही कसोटी चौथ्या दिवशीच समाप्त झाल्या. गेल्या जुलैमध्ये विंडीजने इंग्लंडला हरविले होते. त्यानंतर त्यांचा सलग चौथा पराभव आहे. या पराभवास आम्हीच जबाबदार असल्याचे कर्णधार होल्डर म्हणाला. मिळालेल्या संधींचा आम्ही पुरेपूर लाभ उठवू शकलो नाही. अधूनमधून आम्ही चांगला खेळ केला. पण त्यात सातत्याचा अभाव होता, असेही तो म्हणाला.
6 बाद 244 वरून विंडीजने पुढे खेळ सुरू केला. डावाचा पराभव टाळण्यासाठी त्यांना अद्याप 85 धावांची गरज होती. मात्र होल्डर केवळ एका धावेची भर घालून बाद झाला तर दा सिल्वाने पहिल्याच कसोटीत अर्धशतकी (57) खेळी केली. अल्झारी जोसेफने 12 चेंडूत 4 चौकार, 2 षटकारांसह झटपट 24 धावा फटकावल्या. वॅग्नरने गॅब्रियलला त्रिफळाचीत करून न्यूझीलंडचा विजय साकार केला. चेमार होल्डर 13 धावांवर नाबाद राहिला. बोल्ट व वॅग्नर यांनी प्रत्येकी 3 तर साऊदी व जेमीसन यांनी प्रत्येकी 2 बळी मिळविले.
संक्षिप्त धावफलक : न्यूझीलंड प.डाव 460, विंडीज प.डाव 131, फॉलोऑननंतर विंडीज दु.डाव 79.1 षटकांत सर्व बाद 317 : ब्रेथवेट 24, कॅम्पबेल 68, ब्रुक्स 36, ब्लॅकवुड 20, जे. होल्डर 61 (93 चेंडूत 8 चौकार, 2 षटकार), दा सिल्वा 57 (84 चेंडूत 6 चौकार), जोसेफ 24 (12 चेंडूत 3 चौकार, 2 षटकार), सी.होल्डर नाबाद 13 (15 चेंडूत 3 चौकार), अवांतर 10. गोलंदाजी : बोल्ट 3-96, वॅग्नर 3-54, साऊदी 2-96, जेमीसन 2-43.









