डॉ. सुभाष चव्हाण : तत्परता, काळजी घेतल्यास लाट थोपवू शकतो
प्रतिनिधी/ सातारा
सातारा जिल्हय़ाने ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात कोरोना संसर्गाचा कहर अनुभवला आहे. या कालावधीत शासनाच्या सहकार्यातून अनेक उपाय योजना आरोग्य विभागामार्फत करण्यात आल्या आहेत. सध्या मृत्यूदर रोखण्याचे आव्हान समोर असतानाच कोरोनाच्या दुसऱया लाटेची चर्चा सुरु आहे. मात्र, जिल्हय़ाचा आरोग्य विभाग दुसऱया लाटेला थोपवण्यासाठी सज्ज आहे. नागरिकांनी देखील वेळीच तपासण्या व काळजी घेत सतर्क राहिले पाहिजे, असे मत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी व्यक्त केले.
’तरुण भारत’ शी बोलताना डॉ. चव्हाण म्हणाले, बुधवारी आरोग्य उपसंचालकांनी कोव्हिड हॉस्पिटल्सना भेटी देत जिल्हय़ातील स्थितीचा आढावा घेतला आहे. मृत्यूदर कमी करण्यासाठी सूचना दिली असून तो का वाढला याची कारणे शोधून त्यावर उपाय योजना करण्याबाबतही त्यांनी मार्गदर्शन केले आहे. आरोग्य विभागासह पोलीस, महसूल व शासनाच्या विविध विभाग, माध्यमे, सामाजिक संस्थांनी कोरोनाविरुध्दच्या लढाईत चांगले योगदान दिले आहे. त्याला जिल्हय़ातील नागरिकांनी देखील प्रशासनाचे नियम पाळून संसर्ग रोखण्यासाठी प्रयत्न केले आहेत.
ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये जी स्थिती उद्भभवली होती. त्यावेळी प्रशासनाने जिल्हय़ात ज्या ज्या बाबींची कमतरता जाणवली होती. त्यावेळी त्या पूर्ण करण्यासाठी यंत्रणा सज्ज केली. आजमितीस जिल्हय़ात ऑक्सिजन बेडसह विदाऊट ऑक्सिजन बेड व आयसीयू बेडची संख्या चांगली आहे. होम आयसोलेशनचा पर्यायही देण्यात येत असल्याने सध्या बेड रिक्त आहेत. त्यामुळे दुसऱया कोरोना संसर्ग लाटेची शक्यता वर्तवली जात आहे. त्याला तोंड देण्यासाठी उपचार यंत्रणा सुसज्ज असल्याचे डॉ. चव्हाण यांनी सांगितले.
करोनाची दुसरी लाट जानेवारी, फेब्रुवारी महिन्यात येण्याचा इशारा राज्याच्या आरोग्य विभागाने दिला असून त्यादृष्टीने सतर्क राहण्याचे आदेश जिल्हा प्रशासन, स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्यात आले आहेत. या आदेशाची दखल घेत तयारी सुरू केली आहे. शहरात सर्वाधिक सक्रीय रुग्णसंख्या गृहीत धरुन दहा टक्के खाटा वाढवण्यात येणार आहेत. याशिवाय दररोज तीन हजार करोना चाचण्यांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. दर दहा लाख लोकसंख्येमागे 140 जणांच्या करोना चाचण्या करण्याचे आदेश आरोग्य विभागाने दिले आहेत.
सातारा टीमवर कौतुकाची थाप
आरोग्य उपसंचालकांनी जिल्हय़ाचा आढावा घेताना छत्रपती शिवाजी संग्रहालयात सुरु करण्यात आलेल्या कोव्हिड हॉस्पिटलला भेट दिली. तिथे सुरु असलेल्या कामाची माहिती घेतली. तेथील सोयीसुविधांची पाहणी केल्यानंतर तेथील सर्वांशी संवाद देखील साधला. यावेळी जाताना आरोग्य उपसंचालकांसह त्यांच्या पथकाने आरोग्य विभागाच्या सातारा टीमकडून चांगले काम सुरु असल्याचा अभिप्राय देत कौतुकाची थापही पाठीवर टाकली.
लवकर निदान, लवकर उपचार
होम आयसोलेशनचा पर्याय जिल्हय़ात सुरु आहे. मात्र, होम आयसोलेशनमधील रुग्णांना त्रास वाटल्यास त्यांनी न घाबरता आरोग्य यंत्रणांशी तातडीने संपर्क साधायला हवा. तसेच काही लक्षणे आढळल्यास नागरिकांनी तातडीने तपासणी केली पाहिजे. तपासणीस घाबरुन दिवस पुढे ढकलल्यास उपचारही उशिरा होतात. त्यामुळे लवकर निदान, लवकर उपचार याला आरोग्य यंत्रणा प्राधान्य देत आहे. पुढील काळात देखील सर्वांच्या सहकार्याने साथ थोपवण्यासाठी आरोग्य यंत्रणा निश्चितपणे सज्ज असल्याचे डॉ. चव्हाण यांनी सांगितले.
बाधित वाढ मंदावतेय, पण काळजी घ्याच
सध्याच्या परिस्थितीत बाधित वाढ मंदावत असल्याचे समोर येत आहे. मात्र, पुढील कालावधीत दुसऱया लाटेचा दिलेला इशारा पाहता सर्वांनीच मास्क वापरणे, स्वच्छता, सुरक्षित अंतर व प्रतिकारशक्ती टिकवून ठेवण्यासाठी सतर्क रहायला पाहिजे. लस उपलब्ध झाल्यानंतर कोरोना संपू शकतो. मात्र, तोपर्यंत तरी कोरोनाविरुध्दची लढाई जिंकायची असेल तर अशीच काळजी घेत सर्वांचे रक्षण होवू शकते. परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी एकजुटीने लढा सुरुच ठेवूया, असेही डॉ. चव्हाण यावेळी म्हणाले.








