वृत्तसंस्था / ब्रिजटाऊन (बार्बाडोस)
यजमान विंडीज आणि इंग्लंड यांच्यातील येथे सुरू असलेली दुसरी क्रिकेट कसोटी अनिर्णित राहण्याच्या मार्गावर आहे. शनिवारी खेळाच्या चौथ्या दिवशी विंडीजचा पहिला डाव 411 धावांत आटोपल्यानंतर इंग्लंडने दुसऱया डावात बिनबाद 40 धावा जमवित विंडीजवर एकूण 136 धावांची आघाडी मिळविली आहे.
या कसोटीत इंग्लंड आपला पहिला डाव 9 बाद 507 धावांवर घोषित केला होता. त्यानंतर विंडीजने 4 बाद 228 या धावसंख्येवरून चौथ्या दिवशीच्या खेळाला पुढे प्रारंभ केला आणि त्यांचे सहा फलंदाज 183 धावांची भर घालत तंबूत परतले. कर्णधार पेग ब्रेथवेटने 489 चेंडूत 17 चौकारांसह 160 धावा झळकविल्या.
ब्रेथवेट आणि जोसेफ यांनी पाचव्या गडय़ासाठी 52 धावांची भर घातली. स्टोक्सच्या गोलंदाजीवर जोसेफ झेलबाद झाला. त्याने 1 षटकार आणि दोन चौकारांसह 19 धावा जमविल्या. सकीब मेहमुदने होल्डरला फिशरकरवी झेलबाद केले. त्याने दोन चौकारांसह 12 धावा जमविल्या. 150 धावांचा टप्पा ओलांडल्यानंतर कर्णधार ब्रेथवेट लीचच्या गोलंदाजीवर सातव्या गडय़ाच्या रूपात त्रिफळाचीत झाला. डिसिल्वाने तीन चौकारांसह 33 धावा जमविल्या. रॉच आणि पेरमॉल हे लवकर बाद झाले. विंडीजचा पहिला डाव 187.5 षटकांत 411 धावांवर आटोपला. इंग्लंडतर्फे लीचने 3 तर स्टोक्स आणि सकीब मेहमूद यांनी प्रत्येकी दोन, वोक्स, फिशर आणि लॉरेन्स यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
इंग्लंडने विंडीजवर पहिल्या डावात 96 धावांची महत्त्वपूर्ण आघाडी घेतली.
इंग्लंडने दिवसअखेर दुसऱया डावात 15 षटकांत बिन बाद 40 धावा जमविल्या. लीस 1 चौकारांसह 18 तर क्रॉले दोन चौकारांसह 21 धावांवर खेळत आहे. इंग्लंडने दिवसअखेर विंडीजवर 136 धावांची आघाडी घेतली आहे. तीन सामन्यांची ही कसोटी मालिका खेळविली जात असून पहिली कसोटी अनिर्णित राहिली होती.
संक्षिप्त धावफलक
इंग्लंड प. डाव 9 बाद 507 डाव घोषित, विंडीज प. डाव- 187.5 षटकांत सर्वबाद 411 (ब्रेथवेट 160, ब्लॅकवूड 102, ब्रुक्स 39, जोसेफ 19, होल्डर 12, डिसिल्वा 33, लीच 3-118, स्टोक्स 2-65, शकीब मेहमूद 2-58, वोक्स 1-51, फिशर 1-67, लॉरेन्स 1-21), इंग्लंड दु. डाव- 15 षटकांत बिनबाद 40 (लीस खेळत आहे 18, क्रॉले खेळत आहे 21).
संक्षिप्त धावफलक
इंग्लंड प. डाव 9 बाद 507 डाव घोषित, विंडीज प. डाव- 187.5 षटकांत सर्वबाद 411 (ब्रेथवेट 160, ब्लॅकवूड 102, ब्रुक्स 39, जोसेफ 19, होल्डर 12, डिसिल्वा 33, लीच 3-118, स्टोक्स 2-65, सकीब मेहमूद 2-58, वोक्स 1-51, फिशर 1-67, लॉरेन्स 1-21), इंग्लंड दु. डाव- 15 षटकांत बिनबाद 40 (लीस खेळत आहे 18, क्रॉले खेळत आहे 21).