वृत्तसंस्था/ सिडनी
आगामी कसोटी मालिकेपूर्वी येथे भारत आणि ऑस्ट्रेलिया अ यांच्यातील तीन दिवसांच्या दुसऱया सराव सामन्याला शुक्रवारपासून प्रारंभ होत आहे. 17 डिसेंबर रोजी ऍडलेड येथे होणाऱया दिवस-रात्रीच्या पहिल्या कसोटीपूर्वीची ही रंगीत तालीम राहील. या सरावाच्या सामन्यासाठी भारत संघामध्ये हनुमा विहारी आणि कुलदीप यादव यांचा अनुक्रमे अतिरिक्त फलंदाज आणि गोलंदाज म्हणून समावेश केला आहे.
हा सरावाचा सामना सिडनीच्या मैदानावर प्रकाशझोतामध्ये खेळविला जाणार असून भारतीय संघाला पहिल्या कसोटीपूर्वी प्रकाशझोताचा तसेच गुलाबी चेंडूचा थोडाफार अनुभव मिळू शकेल. ऍडलेडच्या खेळपट्टीशी सिडनीची खेळपट्टी तुलनात्मक नसली तरी या खेळपट्टीवर क्युरेटरने बऱयाच प्रमाणात गवत ठेवले आहे. कोहलीच्या संघाला कसोटी मालिकेचा सराव करण्याची संधी या सामन्यात मिळाली आहे. उभय संघातील टी-20 मालिका संपल्यानंतर आता ऑस्ट्रेलियाला कॅमेरून ग्रीन हा नवा दमदार फलंदाज लाभला आहे. शुक्रवारच्या सरावाच्या सामन्यात त्याचा ऑस्ट्रेलिया अ संघात समावेश असून दर्जेदार कामगिरी करत कर्णधार पेन आणि प्रशिक्षक लँगर यांचे लक्ष वेधून घेण्यासाठी त्याचा प्रयत्न राहील. अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा आणि यष्टीरक्षक साहा तसेच के.एल. राहुल आणि अगरवाल यांना फलंदाजीचा सूर मिळविण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. मात्र पृथ्वी शॉ आणि गिल यांना संघात संधी मिळण्याची शक्यता कमी वाटते. पहिल्या कसोटीसाठी भारतीय संघात अनुभवी खेळाडूंना अधिक प्राधान्य देण्यावर कोहली आणि प्रशिक्षक रवि शास्त्राr भर देतील. गोलंदाजीमध्ये कुलदीप यादवला तसेच अश्विन, उमेश यादव, मोहम्मद सिराज यांच्या कामगिरीत सुधारणा होणे जरूरीचे आहे. हा सरावाचा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी 9.00 वाजता सुरू होईल.









