आसाममध्ये नवा कायदा तत्काळ लागू
वृत्तसंस्था/ गुवाहाटी
आसाम सरकारने 58 वर्षांपूर्वीचा एक मनोरंजक कायदा तात्काळ लागू केला असून त्यामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांचा जोडीदार (पती किंवा पत्नी) जिवंत असताना त्यांच्या दुसऱ्या लग्नावर बंदी घालण्यात आली आहे. तत्काळ प्रभावाने लागू करण्यात आलेल्या या कायद्यानुसार या नियमाचे पालन न करणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांवर केवळ शिस्तभंगाचीच नव्हे, तर दंडात्मक कारवाईही करण्याचा इशारा देण्यात आला आहे. नव्या कायद्यांतर्गत राज्य कार्मिक विभागाच्या अधिसूचनेनुसार कोणताही सरकारी कर्मचारी आपला जोडीदार जिवंत असताना दुसरा विवाह करू शकणार नाहीत.
राज्याचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या सूचनेनुसार या आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करण्यात आल्याचे सांगण्यात आले. नियमांचे पालन न करणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना नोकरीतून काढून टाकले जाऊ शकते. हा आदेश आसाम नागरी सेवा (आचार) अधिनियम, 1965 च्या नियम 26 मधील तरतुदींनुसार जारी करण्यात आल्याचे अधिसूचनेत म्हटले आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास शिस्तपालन अधिकारी संबंधित सरकारी कर्मचाऱ्यावर विभागीय कारवाई करू शकतात. त्यानुसार कर्मचाऱ्याला दंड आकारला जाईल आणि त्याला सक्तीची सेवानिवृत्तीही भोगावी लागू शकते, असे स्पष्ट करण्यात आले आहे. भारतातील मुस्लीम पर्सनल लॉच्या तरतुदींनुसार समाजातील लोक एकापेक्षा जास्त विवाह करू शकतात. हा कायदेशीर गुन्हा मानला जात नाही, मात्र आसाममध्ये सरकारच्या या नव्या आदेशानंतर मुस्लीम कर्मचाऱ्यांनी दुसरा विवाह केल्यास त्यांनाही कारवाईला सामोरे जावे लागू शकते. सरकारच्या या कडक आणि तत्काळ प्रभावाने लागू केलेल्या या नियमाची सध्या देशपातळीवर जोरदार चर्चा सुरू आहे.









