आरोग्य खात्याचे आवाहन
प्रतिनिधी /पणजी
कोरोना महामारीत लसीकरण महत्त्वाचे, फायदेशीर ठरत असून दुसरा डोस शिल्लक राहिलेल्या सुमारे 2,15,000 लोकांनी तो लवकर घ्यावा, असे आवाहन आरोग्य सेवा खात्याने केले आहे. दुसऱया कोरोना लाटेत 2563 जणांनी जीव गमावला त्यापैकी 2359 जणांनी एकही डोस घेतला नव्हता, अशी माहिती आरोग्य खात्याने दिली आहे.
आरोग्य खात्याचे डॉ. राजेंद्र बोरकर, डॉ. आयदा आल्मेदा व डॉ. उत्कर्ष बेतोडकर यांनी पणजीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत वरील माहिती देऊन सांगितले की कोरोना लसीचा एक डोस घेतलेले 185 जण मृत झाले तर दोन्ही डोस घेतलेल्या 19 रुग्णांचा जीव गेला. त्यातील 17 जण हे इतर गंभीर आजाराने त्रस्त होते. कोरोना रोखण्यासाठी लसीकरण महत्त्वाचे असून लस घेतल्यामुळे प्रतिकारशक्ती वाढते आणि गंभीर परिस्थिती निर्माण होत नाही. तसेच हॉस्पिटलात जाण्याच पाळी येत नाही.
राज्यातील 18 वर्षावरील प्रौढ गटात बहुतेक सर्व लोकांचे 100 टक्के लसीकरण पहिल्या डोसचे झाले असून सुमारे 2,15,000 जणांचा दुसरा डोस बाकी आहे. सध्या कोरोनाचा संसर्ग कमी झाला असून बळांची संख्याही खाली आली आहे. एकंदरीत कोरोनाचे प्रमाण मर्यादित नियंत्रणात असून दुसरा डोस घेण्याची हिच योग्य वेळ आहे. तेव्हा जनतेने आता वेळ न घालवता दुसरा डोस तातडीने घ्यावा आणि कोरानापासून पूर्ण बचाव करावा असे त्यांनी नमूद केले.
18 वर्षाखालील मुलांसाठी कोरोनाची लस कधीही येण्याची शक्यता असून त्यांचे लसीकरण सुरू करण्यापूर्वी 18 वर्षावरील प्रौढ गटाचे लसीकरण संपवायचे आहे. म्हणून लोकांनी दुसरा डोस लवकरच लवकर घेवून सरकारला सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले.









