वृत्तसंस्था / इस्लामाबाद :
जम्मू-काश्मीरसंबंधी जगभरात दुष्प्रचार फैलावू पाहणाऱया पाकिस्तानला सौदी अरेबियाने मोठा झटका दिला आहे. ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक को-ऑपरेशन (ओआयसी) च्या बैठकीत जम्मू-काश्मीरचा मुद्दा उपस्थित करू पाहणाऱया पाकिस्तानला सौदी अरेबियाने रोखले आहे. ओआयसी सदस्य देशांच्या विदेश मंत्र्यांच्या बैठकीत काश्मीर मुद्दय़ावर त्वरित चर्चा घडवून आणण्याची पाकची योजना सौदी अरेबियाने हाणून पाडली आहे.
ओआयसीमध्ये 4 खंडांमधील 57 देश सदस्य आहेत. ओआयसीच्या वरिष्ठ अधिकाऱयांची 9 फेब्रुवारी रोजी जेद्दामध्ये बैठक होणार आहे. या बैठकीत जम्मू-काश्मीरसंबंधी चर्चा घडवून आणू पाहणाऱया पाकला सौदी अरेबियानेच आडकाठी केली आहे.
काश्मीरवर मुस्लीम देशांच्या एकजुटतेचा संदेश दिला जावा असे विधान पाकचे विदेशमंत्री शाह महमूद कुरैशी यांनी केले आहे. पण सौदी अरेबियाने नकार दिल्याने पाकिस्तानचा डाव उधळला गेला आहे. यापूर्वी मलेशियातील परिषदेत मुस्लीम देशांनी जम्मू-काश्मीर मुद्दय़ावर मौन बाळगले होते.
भारतीय संसदेने 5 ऑगस्ट रोजी जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हद्दपार केले होते. भारताच्या या निर्णयामुळे पाकिस्तान बिथरला आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी संयुक्त राष्ट्रसंघासह अनेक आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर काश्मीरचा मुद्दा उपस्थित करूनही निराशाच पत्करावी लागली आहे. मुस्लीम देशांची संघटना ओआयसीनेही काश्मीर मुद्दय़ाला महत्त्व देण्यास नकार दिला आहे.