प्रतिनिधी / दिघंची
माणगंगा नदी तशी दुष्काळी. कधीतरी दशक दोन दशकात दर्शन देणारी. बाकी प्रत्येक पिढीच्या पाचवीला दुष्काळच. पण, यावेळच्या परतीच्या पावसाने नदीचे अक्राळ विक्राळ रूप दिसले. त्याने कोणाच्याही अंगावर काटा येईल. पण, दुष्काळी जनता हे पाणी पाहून खुलली आहे. लोकांची पाणी पाहण्यासाठी गर्दी तर होत आहेच पण त्यावर व्हिडिओ, गाणी डायलॉग सुध्दा बनवले जात आहेत.
परतीच्या पाऊसाच्या तडाख्याने ब्रिटिशकालीन राजेवाडी तलाव सलग दुसऱ्या वर्षी पूर्ण क्षमतेने भरला. लिंगीवरे येथील बंधारा तुडुंब भरून पुढे पाणी दिघंची येथील माणगंगा नदीच्या पात्रात येते तसेच दिघंची येथील महाडीकवाडी व निंबाळकर तलाव भरल्याने ते पाणी देखील मानगंगेला येऊन मिळते. परिणामी माणगंगा नदीला पूर आला. कित्येक वर्षे मानगंगेला पाझर फुटतच नाही. परंतु यावर्षी परतीच्या पाऊसाने या पिढीला माणगंगा नदीने आपले अक्राळ विक्राळ रूप दाखवले. नागरिक पाणी बघण्यासाठी पुलावर गर्दी करत आहेत. व्हिडिओ, सेल्फी, फोटो काढत आहेत. सोशल मीडियावर सध्या सगळीकडे दूथडी भरून वाहणारी माणगंगाच दिसत आहे.
अनेक नागरिक सहकुटुंब माणगंगा नदीला आलेले पाणी पाहण्यासाठी येत आहेत.एरव्ही कोरडी ठणठणीत असलेल्या माणगंगा नदीचे वेगळे रूप पाहण्यासाठी नागरिक गर्दी करत असल्याने जणू काय पर्यटनाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. माणगंगा नदीवर फोटो काढण्यासाठी युवक वर्ग गर्दी करत आहे.
माणगंगा नदीचे पाणी पात्राबाहेर गेल्याने शेतीचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. तब्बल 50 वर्षानंतर एवढा मोठा पाऊस झाल्याचे ज्येष्ठ मंडळी सांगत आहेत. परंतु दुष्काळी भागातील शेतकऱ्याला संघर्षाची सवय आहे. मानगंगेच्या या अक्राळ विक्राळ रुपाला बघून देखील दिघंचीकर सुखावत आहे. कारण माणगंगा नदी च दुष्काळी भागातील जीवन वाहिनी आहे. यावेळी प्रचंड वादळी पाऊसाने 1970 च्या दशकातील आठवणी जागृत केल्याची भावना काही ज्येष्ठ नागरिकांच्या व्यक्त केली.
Previous Articleनवरात्रीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारने घेतला ‘हा’ निर्णय
Next Article सोलापूर शहरात 34 पॉझिटिव्ह, एका रुग्णाचा मृत्यू








