बाँबे ब्लड ग्रुप जागतिक रक्तदाते विक्रम यादव यांचे जिल्ह्यात रक्तदान : ऐच्छिक रक्तदान दिनाच्या पूर्वसंध्येला केले रक्तदान
प्रतिनिधी / मालवण:
दि.३० सप्टेंबर रोजी जिल्हा रुग्णालय रक्तपेढीत सांगली तासगावचे सुपुत्र विक्रम विश्रांत यादव यांनी जगातील अत्यंत दुर्मिळ असे बाँबे ब्लड ग्रुप रक्ताचे रक्तदान केले.
जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील नांदोस येथिल श्री. राजाराम गोविंद गावडे वय ६५ वर्षे यांचे एचबी ४ ग्रॅम होते तसेच त्यांचे डायलेसीसही चालू आहे, त्याकरिता त्यांना जिल्ह्यातील सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानच्या बाँबे ब्लड ग्रुपच्या ४ सदस्यांपैकी एक सुधीर कांबळी यांनी रक्तदान केले होते, रुग्णाला आणखी एका रक्तबॅगची आवश्यकता होती, त्या करिता जिल्ह्यातील अन्य ३ रक्तदाते तब्बेतीच्या कारणाने रक्त देऊ शकत नव्हते. त्यामुळे सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानचे सांगली तासगावचे मित्र दुर्मिळ रक्तदाते श्री. विक्रम यादव हे स्वतः सिंधुदुर्ग जिल्ह्यात आले व त्यांनी अत्यंत अमूल्य असे रक्तदान केले.
विक्रम यादव यांचे हे तब्बल ६६ वे रक्तदान आहे. यापुर्वी त्यांनी रांची, उत्तराखंड,झारखंड,विशाखापट्टणम,आग्रा, विजापूर, बेंगलोर,म्हैसूर, रत्नागिरी, कर्नाटकसह दुबई, पाकिस्तान,बांग्लादेश इत्यादी ९ देशात रक्तदान केेले आहे.
पाच वर्षापूर्वी प्रसुती दरम्याने रक्तस्त्रावामुळे गंभीर झालेल्या श्रीमती अंजली हेळकर यांना हा ग्रुप मिळणे असंभव होते असे डॉक्टरनी सांगितले होते, त्यावेळी सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानकडे पोस्टद्वारे पोहचलेली ही मागणी पुढे विक्रम यादव यांना संध्याकाळी ७ वा पोहचताच, सांगली ते रत्नागिरी असा प्रवास करत विक्रम यादव यांनी रात्रौ १२ वा रत्नागिरीत जिल्हारुग्णालयात पोहचत रक्तदान करुन त्यांचे प्राण वाचविले होते. ते श्रीम.अंजली हेळकर यांचेसाठी जीवनदूत ठरले होते,आज विक्रम सिंधुदुर्गात आलेत हे समजताच श्रीम अंजली यांनी त्यांना फोन करुन आपल्या देवगड येथील माहेरी वडिलांना भेटून जाण्यास सांगितले. विक्रम यांनी त्या निमंत्रणाचा मान ठेवत आज सहकुटुंब देवगडला त्यांच्या माहेरी गेले. व त्यानंतर ते सांगलीसाठी रवाना झाले.









