ओटवणे / प्रतिनिधी-
गोवा-बांबोळी रूग्णालयात महिलेला ओ पाॅझिटिव्ह तर सावंतवाडी रुग्णालयात वृद्धाला बी- निगेटिव्ह या दुर्मिळ रक्तगटाची आवश्यकता होती. याबाबत दोन्ही रुग्णांच्या नातेवाईकांनी सावंतवाडीतील युवा रक्तदाता संघटनेशी संपर्क साधताच तात्काळ रक्तदाते ऊपलब्ध करून या दोन्ही रुग्णांना जीवदान देण्यात आले. त्यामुळे या दोन्ही रक्तदात्यांसह युवा रक्तदाता संघटना या दोन्ही रुग्णांसाठी देवदूत ठरली आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे या रक्तदाता संघटनेने सलग चौथ्यांदा गोवा बांबुळी रुग्णालय रक्तदाते पाठवून रुग्णांचे प्राण वाचविले.
बांबोळी रूग्णालयात सुनंदा गोविंद चव्हाण या महिला रुग्णावर ह्रदय शस्त्रक्रिया होती. त्यासाठी ओ पाॅझिटिव्ह रक्ताची आवश्यकता होती. नातेवाईकांनी युवा रक्तदाता संघटनेशी संपर्क साधताच युवराज नाईक (कुडाळ) व लक्ष्मण वरक (फोंडा) यांंनी गोवा बांबोळी रुग्णालयाच्या रक्तपेढीमध्ये जाऊन रक्तदान केले. यासाठी अवधूत गावडे यांचे सहकार्य लाभले.
सावंतवाडी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या आप्पासाहेब करनुरे ( ७८) या रुग्णाला तातडीने बी- निगेटिव्ह या दुर्मिळ रक्तगटाची आवश्यकता होती. हे समजताच कोलगाव येथील सिद्धेश नाईक आणि आयुर्वेदिक कॉलेजचा विद्यार्थी वैभव मस्के या दोघांनी उपजिल्हा रुग्णालयातील रक्तपेढीमध्ये जाऊन रक्तदान केले.









