वनविभागाच्या सावर्डे शाखेची कारवाई
चिपळूण
कोणतीही परवानगी नसताना दुर्गेवाडी येथे स्वमालकीच्या जागेतील झाडे तोडून त्याचा साठा केल्याप्रकरणी वनविभागाच्या सावर्डे शाखेतील अधिकाऱयांनी या लाकूडसाठय़ावर धाड टाकून जप्तीची कारवाई केली. सुमारे 50 हजारहून अधिक किंमतीचा हा लाकूड साठा आहे.
वनविभागाने दिलेल्या माहितीनुसार श्रीराम दिगंबर शिंदे यांनी आपल्या मालकीच्या जागेतील जंगली झाडे तोडली होती. त्या लाकडाचा साठा त्यांनी दुर्गेवाडी-पाते रस्त्याच्या कडेला करुन ठेवला होता. याप्रकरणी वनविभागाकडे ऑनलाईन तक्रारीदेखील झाल्या होत्या. त्यानुसार विभागिय वनाधिकारी रमाकांत भवर, परिक्षेत्र वनाधिकारी सचिन निलख यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल राजश्री कीर, नांदगाव वनरक्षक रानबा बंबरेकर आदीच्या पथकाने शुक्रवारी धाड टाकून 150 घनमिटर लाकूड साठा जप्त केला.
याप्रकरणी जागा मालक शिंदे यांची वनविभागाने चौकशी केल्यानंतर त्यांनी वनविभागाची कोणतीच परवानगी न घेता हा लाकूडसाठा केल्याचे पुढे आले.









