खाजनात 35 हजार चौ. मी. क्षेत्रात भाताचे पीक कृषी विज्ञान केंद्राचा उपक्रम : फिलिपीन्सच्या ‘गोवा धन’ बियाणाचा वापर
सुनील फातर्पेकर / कुंकळ्ळी

सध्या कोरोना व लॉकडाऊनच्या अनुषंगाने विविध घटना-घडामोडी घडत असल्या, तरी दुसऱया बाजूने काही सकारात्मक बाबीही साकारत असून वेळ्ळी मतदारसंघातील दुर्गा या ठिकाणी 35 हजार चौरस मीटर क्षेत्रात करण्यात आलेली भातशेती ही अशीच एक महत्त्वपूर्ण घडामोड आहे. सुमारे 45 वर्षांनंतर सरकारच्या मालकीच्या या खाजन जमिनीत भाताचे पीक घेण्यात आले असून हे स्तुत्य काम राज्य कृषी विज्ञान केंद्राने केलेले आहे.
दुर्गा येथे सरकारी मालकीची सुमारे 30 हेक्टर जमीन असून त्यापैकी वरील भागात ही भातशेती करण्यात आली आहे. जानेवारीत त्याची लागवड करण्यात आली होती. आता पीक तयार झाले असून येत्या एक-दोन दिवसांत यंत्राच्या मदतीने कापणी करण्यात येणार असल्याची माहिती कृषी विज्ञान केंद्राच्या मडगाव कार्यालयाचे प्रमुख संजीव मयेकर यांनी दिली. या शेतजमिनीत ‘गोवा धन-1’, ‘गोवा धन-3’ आणि ‘गोवा धन-4’ या जातीची भाताची बियाणे वापरण्यात आली आहेत. त्यापैकी ‘गोवा धन-3’ हे बियाणे फिलिपीन्समधून आणलेले आहे, असे त्यांनी सांगितले.
2011 मध्ये आपण गोव्यात कृषी वैज्ञानिक या नात्याने आलो. त्यावेळी पाहणी करताना दुर्गा येथील ही जमीन पाहिली होती आणि लागवडीच्या दृष्टीने ती योग्य असल्याचे जाणवले होते. त्यामुळे या जमिनीत लागवड करण्यासाठी आपण भाताची 500 किलो बियाणे दिली होती. पण लागवडीच्या दृष्टीने पुढे काही हालचाली झाल्या नाहीत. त्यानंतर वेळ्ळीतील ग्रँड दुर्गा येथील जमिनीत आपण पुढाकार घेऊन भाजी, तूर डाळ यांचे पीक घ्यायला लावले होते. गेल्या जूनमध्ये आपण मडगाव कार्यालयाचे प्रमुख या नात्याने जबाबदारी स्वीकारली. त्यानंतर दुर्गा येथील जमिनीत उत्पन्न घ्यायचेच असा निर्धार केला, असे मयेकर यांनी सांगितले.

यंत्राच्या मदतीने नांगरणी, पेरणी
त्यावेळी सदर जमिनीत गुडघाभर उंचीचे गवत वाढलेले होते, चिखल झालेला होता. त्यानंतर यंत्राच्या मदतीने सदर गवत व अन्य झाडे कापून काढली. तसेच काही ठिकाणी जमीन सपाट करून घेण्यात आली. यंत्राच्या मदतीने नांगरणी व पेरणीवर जवळपास दीड लाख खर्च आला. केंद्राचे फार्म अधिकारी प्रज्योत साखळकर व इतर कर्मचाऱयांनी याकामी चांगले सहकार्य केले, असे त्यांनी सांगितले.
दोन पिके घेण्याचा विचार
ही सरकारी जमीन मागील तेरा वर्षांपासून कृषी विज्ञान केंद्राच्या ताब्यात आहे. या जमिनीत भाताचे पीक घेण्याच्या प्रयोगाला कसे यश मिळते याची उत्सुकता आपल्याला लागून राहिली होती. या जमिनीत दोन पिके सहज घेता येतात. त्यादृष्टीने आपण प्रयोग करून पाहणार आहे. त्याचप्रमाणे उर्वरित पडीक जमिनीतही पीक घेऊन पाहण्याचा आपला विचार आहे, अशी माहिती मयेकर यांनी दिली.
सरकारकडून शेतीसाठी भरीव मदत करण्यात येत असताना लोक पुढे सरसावत नाहीत ही खेदाची गोष्ट आहे. दुर्गा येथे करण्यात आलेली लागवड पाहून काही जण शेतीसाठी पुढे सरसावले असून काहींनी केंद्राकडे त्यादृष्टीने संपर्क साधला आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
उस्किणीबांधाचे वापरले पाणी
मयेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, कुंकळ्ळीतील उस्किणीबांध येथील वाया जाणारे पाणी या भातशेतीसाठी वापरात आणले गेले असून शेतीची देखभाल घेण्याचे आणि गुरांपासून त्याची हानी होऊ नये यासाठी नजर ठेवण्याचे काम रामदास गावकर, राजेंद्र वेळीप, बाबू कोमरपंत व विठोबा वेळीप हे करत आहेत. त्यांना तांत्रिक विभागाचे ‘एसडीओ’ बोडके यांचेही सहकार्य मिळत आहे. सध्या पिवळय़ाधमक कणसांनी भरलेले हे शेत येणाऱया-जाणाऱयांचे लक्ष वेधून घेत असून खूप जण थांबून विचारपूस करतात व माहिती घेतल्यानंतर या उपक्रमाचे कौतुक करतात, असे रामदास गावकर यांनी सांगितले.
दुर्गा येथे करण्यात आलेला भातशेतीचा प्रयोग हा शेतजमिनी पडीक ठेवणाऱयांना संदेश देणारा उपक्रम आहे. कुंकळ्ळी व नजीकच्या परिसरांत लाखो चौरस मीटर जमीन पडीक असून ती लागवडीखाली आणण्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे दिसून येत आहे. कुंकळ्ळी परिसरात शेतजमीन करणे सोयीस्कर व्हावे म्हणून पाटाद्वारे साळावली जलाशयाचे पाणी पोहोचविण्यात आलेले आहे. मात्र त्याचा कितपत उपयोग केला जातो हा संशोधनाचा विषय आहे.
दुर्गा रोपवाटिकेत हजारभर कवाथे तयार

कृषी विज्ञान केंद्राच्या ताब्यात ‘ग्रँड दुर्गा’ येथेही जमीन असून त्या ठिकाणच्या रोपवाटिकेत हजारभर कवाथे तयार करण्यात आले आहेत. हे कवाथे नंतर मडगाव कार्यालयात नेले जाणार आहेत. तेथे यापूर्वी बांधलेल्या कामगारांसाठीच्या दोन चाळवजा वास्तू व एक गोदाम तसेच कृषी विज्ञान केंद्राचे छोटेसे कार्यालय आहे. या कार्यालयाचे सध्या नूतनीकरण केले जात आहे.









