प्रतिनिधी/ खानापूर
दुर्गानगर, खानापूर येथील त्या जळालेल्या महिलेचे रविवारी बेळगाव येथील रुग्णालयात निधन झाले. सदर महिलेचे नाव शैला हणमंत सनदी (वय 40) असे आहे. ती गेल्या 1 डिसेंबर रोजी भाजून जखमी झाली होती. त्यावेळी तिने पोलिसांना आपल्याला काही मुलांनी घरी येऊन धमकी दिली व आपल्या अंगावर रॉकेल ओतून पेटविले, असा जबाब दिला होता. त्यावेळी पोलिसांनी तिला उपचारासाठी बेळगावच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. जवळजवळ 40 दिवसांनी तिचे निधन झाले. याप्रकरणी पोलिसांनी तिने दिलेल्या नावांच्या आधारे संबंधित मुलांचा शोध सुरू आहे.









