बाळेकुंद्री : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्रामीण भागात रुग्णवाहिकेच्या मोफत सेवेबरोबर आरोग्य तपासणीही करण्यात येत आहे. रविवारी (शिंदोळी ता. बेळगाव) येथील शाळेच्या आवारात अनेक जणांची मोफत आरोग्य तपासणी केली. यावेळी बोलताना डॉ. गुरुप्रसाद कोतीन म्हणाले, कोराना संसर्गापासून दूर राहण्यासाठी शरीराची काळजी घेतली पाहिजे. त्यानुसार रोज योगासने, व्यायाम करण्याची गरज आहे. यावेळी नागरिकांची आरोग्य तपासणी करून प्रतिकारशक्ती वाढविण्याकरिता मोफत गोळय़ा व औषधे दिली. तसेच कोरोनाबाबत जनजागृती केली.
बाळेपुंद्री ग्रामपंचायतीचे सदस्य युवराज जाधव यांनी मोफत दिलेली रुग्णवाहिका सोबत घेऊन डॉ. गुरुप्रसाद कोतीन यांच्या नेतृत्वाखाली वैद्यकीय पथक बेळगाव, बैलहोंगल, तालुक्यातील अती दुर्गम भागात दाखल होत आहेत. रोज दुपारी 12 ते सायंकाळी उशिरापर्यंत आरोग्य तपासणी करण्यात येत आहे.
ग्रामीण रुग्णांना दिलासा देण्याचा प्रयत्न

लॉकडाऊनमुळे नागरिकांना घराबाहेर पडता येत नसल्याने दुर्गम भागातील अनेक रुग्णांना इस्पितळात वेळेवर पोहचता येत नाही. त्यामुळे त्यांना दिलासा देण्याचा आपला व सहकाऱयांचा प्रयत्न असून कोरोनाकाळात रक्तदाब, मधुमेहसारख्या रुग्णांना वेळोवेळी सल्ला आवश्यक असतो. अशा रुग्णांना लॉकडाऊनच्या आणीबाणीच्या परिस्थितीत त्यांना प्राथमिक सल्ला द्यावा. तसेच इतर वैद्यकीय मार्गदर्शन करण्यासाठी मोफत दिलेल्या रुग्णवाहिकेसोबत हा आरोग्य सेवा उपक्रम सुरू केला आहे.
-युवराज अनंतराव जाधव बाळेपुंद्री खुर्द ग्रा.पं सदस्य









