वार्ताहर / कुडवाड
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दरावस्ती तालुका माण येथील नवोपक्रमशील व तंत्रस्नेही शिक्षिका भारती आकाराम ओंबासे यांना नुकताच सर फाउंडेशन टीचर इनोव्हेशन नॅशनल अवॉर्ड 2020 हा राष्ट्रीय स्तरावर पुरस्कार जाहीर झाला. रिसर्च फाउंडेशन (सर फाउंडेशन) महाराष्ट्रातील राष्ट्रीयस्तर नवोपक्रम स्पर्धा 2020 आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेतील प्राप्त नवोपक्रमातून भारती ओंबासे यांच्या अतिदुर्गम भागातील स्व-अनुभवातून शिक्षण या नवोपक्रमाची राष्ट्रीय स्तरावर निवड करुन सर फाउंडेशन टीचर इनोवेशन नॅशनल अवॉर्ड 2020 हा राष्ट्रीय स्तर पुरस्कार जाहीर करण्यात आला.
स्टेट अँड रिसर्च फाउंडेशन महाराष्ट्र हे देशातील उपक्रमशील शिक्षकांचे एक अग्रगण्य नेटवर्क आहे. शिक्षकांच्या गुणवत्तावाढीसाठी विविध नाविन्यपूर्ण उपक्रमाच्या माध्यमातून सन 2006 पासून हे सर फाउंडेशन कार्यरत आहे. यंदा राष्ट्रीय शैक्षणिक नवोपक्रम स्पर्धा 2020 घेण्यात आल्या होत्या, याचा निकाल जाहीर झाला आहे. देशातील 169 शिक्षकांना त्यांनी शालेय स्तरावर केलेल्या विविध नाविन्यपूर्ण उपक्रम व शैक्षणिक प्रयोगाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी केलेल्या प्रयत्नांची नवोपक्रमांची निवड करण्यात आलेली आहे. यामध्ये प्राथमिक, माध्यमिक शिक्षक, केंद्रप्रमुख, साधनव्यक्ती, विषय सहाय्यक, शिक्षण विस्तार अधिकारी, गटशिक्षणाधिकारी व अधिव्याख्याता डायट यांचा समावेश आहे.
सर फाउंडेशनने शिक्षण विषयक अनेक महत्त्वपूर्ण उपक्रम राबवले आहेत. रवि. जे. मथाई सेंटर फॉर एज्युकेशनल इनोव्हेशन भारतीय प्रबंध संस्था अहमदाबाद हनी बी नेटवर्क, सृष्टी अहमदाबाद, डाएट व शालेय शिक्षण विभाग यांच्या सोबत विविध उपयुक्त उपक्रम प्राथमिक शिक्षणासाठी राबवलेले आहेत. सर फाउंडेशनच्या वतीने घेण्यात आलेल्या राष्ट्रीय स्तरावर नवोपक्रम स्पर्धा 2020 मधून भारती ओंबासे मॅडम यांची निवड करण्यात आली आहे. ‘एज्युकेशन इनोव्हेशन बँक’ या प्रकल्पाअंतर्गत हे अवॉर्ड जाहीर करण्यात आले आहेत. शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी केलेल्या नाविन्यपूर्ण शैक्षणिक प्रयोगाच्या आधारावर तज्ञ समितीमार्फत निवड केली जाते. या पुरस्काराचे वितरण सर फाउंडेशन स्टेम व जस्ट लर्निंगकडून डिसेंबर 2020 मध्ये आयोजित राष्ट्रीय स्तरावरील कॉन्फरन्स मध्ये होणार आहे. यावेळी शिक्षण क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या एज्युकेशन कॉन्फरन्स 2020 मध्ये विविध विषयावर शैक्षणिक मंथन होणार आहे. शिक्षणतज्ञ व्याख्यान, परिसंवाद, गटचर्चा, नाविन्यपूर्ण शैक्षणिक प्रयोगाचे सादरीकरण, पुरस्कार वितरण अशा विविध कार्यक्रमाची मेजवानी सहभागी शिक्षकांना मिळणार आहे.
भारती आकाराम ओंबासे या माण तालुक्यातील अतिदुर्गम भागात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दरावस्ती (टाकेवाडी) या शाळेत दुर्गम भागातील विद्यार्थ्यांसाठी व त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी विविध नवीन उपक्रम राबवून त्यांच्यासाठी सतत प्रयत्नशील उपक्रमशील शिक्षिका म्हणून त्या प्रचलित आहेत. सध्या कोरोना काळातही दुर्गम भाग असूनही दरावस्ती शाळा मात्र शिक्षणापासून वंचित नाही, या लॉकडाउनच्या काळात त्यांनी वीस ते पंचवीस उपक्रम विद्यार्थ्यांसाठी यशस्वीरीत्या राबवले आहेत. कोरोनाने जगाला स्तब्ध केली आहे. परंतु दरावस्ती शाळेचे शिक्षण थांबवता आले नाही, अशा या गुणी शिक्षिकेच्या उपक्रमाची निवड राष्ट्रीय स्तरावर झाली हे समजताच सर्व स्तरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.









