पूर्ण भारताचे होणार दर्शन, जुलैमध्ये पूर्णपणे तयार होणार
1 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱया दुबई एक्स्पोची तयारी जोरात सुरू आहे. 6 महिन्यांपर्यंत चालणाऱया या मेगा इव्हेंटमध्ये 192 हून अधिक देश सहभागी होत आहेत. प्रत्येक देश स्वतःची संस्कृती आणि क्षमतेचे प्रदर्शन करण्यासाठी अत्याधुनिक पॅव्हेलियन निर्माण करत आहे. 500 कोटी रुपयांच्या खर्चातून 4800 चौरस मीटरमध्ये निर्माण होणार भारतीय पॅव्हेलियनही आकार घेत आहे.
लुक, पंट फेस आणि स्ट्रक्चरसह सुमारे 75 टक्के काम पूर्ण झाले आहे. एप्रिलपर्यंत स्ट्रक्चरल कार्य पूर्ण होणार आहे. त्यानंतर क्यूरेशन आणि प्रदर्शनांशी संबंधित कामे होतील. जुलैत हे भव्य पॅव्हेलियन भारतीय एक्स्पो टीमच्या उपलब्ध करण्यात येईल. भारतीय वाणिज्य दूतावासानुसार हे पॅव्हेलिन अमाप संधी उपलब्ध असणारा वेगवान भारत सादर करणार आहे.
सर्व क्षेत्रांमध्ये भारताचा उदय प्रदर्शित करणार असून अमृत महोत्सवाचा जल्लोष साजरा करणार आहे. पुढील 75 वर्षांसाठी देशाचा दृष्टीकोन जगासमोर मांडणार आहे. एक्स्पोदरम्यान येणारे सण-सोहळे म्हणजेच दिवाळी, लोहडी, पोंगल, वसंत पंचमी आणि होळीचेही आयोजन होणार असून सर्व सहभागी देशांना आमंत्रित करण्यात येणार आहे.
मंगळ मोहिमेची कथा
हे पॅव्हेलियन दोन हिस्स्यांमध्ये निर्माण होत आहे. पहिल्या भागात लोक भारताला समजून घेतील. दुसऱया भाग व्यावसायिक कार्यांसाठी असणार आहे. पॅव्हेलियनमध्ये प्रवेश करताच एका भुयारातून जात अंतराळासारख्या वातावरणात पोहोचाल. यात भारताच्या मंगळ मोहिमेची अद्भूत कथा प्रदर्शित केली जाईल. त्यानंतर आरोग्य आणि योगची ओळख करून देण्यात येईल. पहिल्या मजल्यावर ‘एंडलेस कलर्स ऑफ इंडिया’चे प्रदर्शन करण्यात येणार आहे.