वार्ताहर/ राजापूर
राजापूर शिळ-चिखलगाव-सौंदळ मार्गावर चिखलगावनजीक ट्रक आणि दुचाकी यांच्यामध्ये झालेल्या भीषण अपघातात दोघा तरूणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर एकजण गंभीर जखमी झाला. मंगळवारी सायंकाळी 6 च्या सुमारास ही घटना घडली.
यात फैजान अकबर रायबकर (23), समीर महमद नाईक (20, दोघेही राहणार सौंदळ मुस्लीमवाडी) हे तरूण ठार झाले आहेत. तर अमान मुसवीर टोले (18) हा जखमी झाला आहे. या अपघाताबाबत मिळालेल्या माहितीनुसार, फैयाज, समीर व अमान हे तिघे मंगळवारी सायंकाळी दुचाकीवरून राजापूरकडून सौंदळकडे जात होते. राजापूर शिळ, गोठणेदोनिवडे चिखलगांव-सौदळ मार्गावर चिखलगाव धरणापासून काही अंतरावरील एका वळणावर समोरून वेगात येणाऱया ट्रकची आणि दुचाकीची जोरदार धडक झाली. धडक एवढी जोरदार होती की, दुचाकीवरील समीर नाईक हा जागीच ठार झाला. तर फैजान व अमान हे दोघे गंभीर जखमी झाले.
त्यांना राजापूर ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र फैजान याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. तर गंभीर जखमी झालेल्या अमान याच्यावर प्राथमिक उपचार करून त्याला अधिक उपचारासाठी रत्नागिरीत हलविण्यात आले आहे. या प्रकरणातील अपघाताला कारणीभूत असलेला ट्रकचालक हा ट्रकसह फरार झाला आहे. या अपघाताची माहिती मिळताच राजापूर ग्रामीण रूग्णालयात मोठी गर्दी झाली होती. दोघा तरूणांच्या अपघाती मृत्यूने सौंदळ गावावर शोककळा पसरली आहे.









