प्रतिनिधी / मडगांव
लॉकडावनच्या काळातही दुचाक्या चोरणाऱया एका टोळीला जेरबंद करण्यात फातोर्डा पोलिसांनी यश मिळवले.
फातोर्डा पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक कपील नायक यांनी या प्रकरणी ‘तरुण भारत’ला सविस्तर माहिती दिली.
संचारबंदीच्या काळातही दुचाकीवरुन संचार करत असलेल्या एका युवकाला फातोर्डा पोलिसांनी अडविले. पाहतो तर ज्या दुचाकीवरुन हा युवक प्रवास करीत होता त्याच्याकडे वाहनाची कागदपत्रे नव्हती. त्याला ‘तालांव’ देण्यासाठी म्हणून जवळच असलेल्या पोलीस स्थानकात नेण्यात आले.
फातोर्डा पोलीस चौकीत या युवकाकडे या वाहनासंबंधी चौकशी करण्यात आली तेव्हा आपण चालवत असलेली दुचाकी आपली नव्हे, त्याने पोलिसांनी सांगितले. ही मोटरसायकल आपण मडगावच्या कदंब बस स्थानकाजवळून चोरली असल्याची माहिती दिली.
योगायोग असा की कदंब बस स्थानकाजवळून एका पल्सर दुचाकीची चोरी झाली होती आणि त्यासंबंधीची नोंद पोलिसांनी केलेली होती. या युवकाची पोलिसांनी सखोल चौकशी केली तेव्हा दुचाक्या चोरणारी आपली एक टोळीच असल्याची माहिती या युवकाने दिली.
या चोरी प्रकरणात आपला दुसरा एक साथीदार असून त्याचे नाव संजय केरकटा (21) असल्याची माहिती या युवकाने दिली. संशयित संजय याला ताब्यात घेण्यात आले. त्याची सखोल चौकशी करण्यात आली. या चौकशीत या टोळीने चोरलेल्या एकूण 5 दुचाक्या बाणावली येथे एका जागी ठेवलेल्या असल्याची माहिती संजय याने देताच फातोर्डा पोलीस बाणावली येथे गेले.
बाणावली येथे त्या जागी पोलिसांनी धाड घातली आणि एकूण 5 दुचाक्या जप्त केल्या. त्यात सुमारे 2.5 लाख रुपये किंमतीची केटीएम मोटरसायकल, एक पल्सर मोटरसायकल व 3 एव्हीएटर स्कुटरी जप्त केल्या. जप्त केलेल्या दुचाक्या वेगवेगळय़ा पोलीस स्थानकाच्या परिसरातून चोरण्यात आल्या होत्या.
अटक करण्यात आलेल्या शाबुद्दीन शेख, पुलवाडो -बाणावली येथील संजय केरकटा याना आज मंगळवारी न्यायालयापुढे उभे करण्यात येणार आहे. या टोळीतील तिसरा संशयित एक अल्पवयीन मुलगा असून त्याला योग्य त्या प्राधिकरणासमोर उभे करण्यात येणार आहे. साहाय्यक उपनिरीक्षक हेमंत वेळीप या प्रकरणी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तपास करीत आहेत.









