तब्बल 77 वेळा रहदारी नियमांचे उल्लंघन
बेंगळूर
तब्बल 77 वेळा रहदारी नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी बेंगळूरच्या मडिवाळ रहदारी पोलिसांनी दुचाकीस्वाराला 42,500 रुपयांचा दंड ठोठावला आहे. शहरात कारवाई सुरू असताना शुक्रवारी अरुणकुमार रहदारी विभागाच्या पोलिसांच्या हाती सापडला. यावेळी अरुणकुमार याला दंडाची पावती देत दुचाकी ताब्यात घेण्यात आली.
लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर बेंगळूर शहरात रहदारी नियमांचे उल्लंघन करणाऱयांविरोधात कारवाई आणखी कठोर करण्यात आली आहे. दोन महिन्यापूर्वी बुलेटचालकाला सुमारे 58,200 रुपये दंड भरावा लागला होता. त्याच्याविरोधात 107 वेळा रहदारी नियमांचे उल्लंघन केल्याची नोंद होती. आता 77 वेळा नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी अरुणकुमार याला 42,500 रुपयांचा दंड ठोठावला असून दंडाची रक्कम जमा केल्यानंतरच अरुणकुमारला ताब्यात घेतलेली दुचाकी परत करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले आहे.