कोकराळे व उंबर्डे गावावर शोककळा, चौकीचा आंबा येथील दुर्घटना
वार्ताहर/ औंध
खटाव तालुक्यातील चौकीचा आंबा येथे रविवारी सायंकाळी उशिरा दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन दोघांचा मृत्यू झाल्याची घटना घडल्याने खटाव तालुक्यावर शोककळा पसरली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, कोकराळे येथील सुट्टीवर आलेला रेल्वे जवान केदार श्रीरंग सावंत औंधकडून चौकीचा आंबा येथे निघाले होते, तर उंबर्डे येथील अधिकराव पवार हे चौकीचा आंबा येथील आपले दुकान बंद करून औंधकडे निघाले असता समोरासमोर जोरदार भीषण अपघात झाला. नागरिकांनी लगेच दवाखान्यात हलविले असता अतिरक्तस्त्रवाने दोघांचाही मृत्यू झाला असल्याची माहिती मिळाली. याबाबत रात्री उशिरापर्यंत घटनेची नोंद करण्याचे काम सुरू होते.
दरम्यान, रेल्वे जवान केदार सावंत यांच्यावर कोकराळे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.








