सलून, क्रीडा संकुले सुरु करण्यास मान्यता
प्रतिनिधी/ पणजी
राज्यस्तरीय संचारबंदीची मुदत एका आठवडय़ाने म्हणजे 12 जुलैपर्यंत वाढवण्यात आली असून दुकाने सकाळी 8 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत खुली ठेवण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्याशिवाय सलून व क्रीडा संकुले (बाह्य विभाग) सुरु करण्यासही अनुमती देण्यात आली आहे.
गोव्यातील कोरोनाचे संकट कमी झाले असले तरी अद्याप संपलेले नाही. संसर्ग – बळी कमी संख्येने चालू असून त्याची दखल घेऊन ही मुदतवाढ देण्यात आली आहे. दुकानांसाठी दुपारी 3 वाजेपर्यंत असलेली मर्यादित वेळ आता 3 तासाने वाढवून सायंकाळी 6 वाजेपर्यंत करण्यात आली आहे, अशी माहिती मुख्य़मंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.
नोकर भरतीसाठी विविध खात्यांचा आढावा
दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी नोकरभरतीसाठी विविध सरकारी खात्यांचा आढावा घेण्याचे काम सुरु केले असून अनेकांना बढती देण्याचेही निश्चित केले जाणार आहे. त्यासाठी कायद्यात दुरुस्ती, सुधारणा करण्यात येणार असून त्यासाठीची दुरुस्ती विधेयके पावसाळी अधिवेशनात मांडण्यात येणार आहेत. पोलीस खात्यात सुमारे 2 हजार पदे भरली जाणार असून त्यातील 1300 पदांची जाहिरात यापूर्वीच करण्यात आली आहे, परंतु पावसामुळे त्या पदांची चाचणी स्थगित करण्यात आल्याचे डॉ. सावंत यांनी नमूद केले.
9 मे पासून सुरु झालीय संचारबंदी
दि. 9 मे पासून संचारबंदी सुरु झाली असून आता ती पुन्हा वाढवण्यात आल्यामुळे गेले दोन महिने त्यात संपले आहेत. जोपर्यंत कोरोना संसर्ग संपुष्ठात येत नाही, बळी जाणे बंद होत नाही, तोपर्यंत संचारबंदी वाढत रहाणार असा अंदाज दिसून येत आहे.
लोकांना खरेदीसाठी मिळाला दिलासा
दुकानांना आता सांयकाळी 6 वाजेपर्यंत उघडी ठेवण्यास मुभा दिल्याने ती संपूर्ण दिवसभर उघडी रहाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे दिवसभर जनजीवन चालू रहाणार असल्याचे उघड झाले असून सायंकाळी 6 नंतरच संचारबंदी लागू रहाणार आहे. दुकाने दिवसभर उघडी रहाणार असल्याने जनतेलाही दिलासा मिळाला आहे. लोकांना आता खरेदीसाठी दिवसभर वेळ मिळणार आहे.
आता केशकर्तनालयेही होणार सुरु
केश कर्तनालये गेली 2 महिने बंद होती. ती बंद असल्याने अनेक लोकांना केस कापणे, दाढी करणे यासाठी अडचण निर्माण झाली होती. सलून चालकांनी देखील ती उघडी ठेवण्यासाठी मुख्यमंत्री डॉ. सावंत यांना निवेदन देऊन विनंती केली होती. त्याची दखल घेऊन सरकारने ती दुकाने खुली करण्यास मान्यता दिली आहे. त्यामुळे लोकांची केस-दाढी करण्याची समस्या दूर झाली आहे.









