प्रतिनिधी / कोल्हापूर
लॉकडाऊनमुळे गेल्या दीड वर्षात व्यापारी, दुकानदार यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. चुकीच्या नियोजनामुळे जिल्हय़ात कोरोना वाढत असताना व्यापाऱयांना त्यांची दुकाने, व्यवसाय बंद ठेवणे जिल्हा प्रशासनाने बंधनकारक केले आहे. हा त्यांच्यावर अन्याय आहे. दुकाने बंद असताना व्यापाऱयांनी कर कसा भरायचा? असा सवाल करत माजी खासदार धनंजय महाडिक यांनी सर्व प्रकारची दुकाने, व्यवसाय सुरू करण्यास परवानगी द्या, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा दिला आहे.
पत्रकात धनंजय महाडिक यांनी म्हटले आहे : फेरीवाल्यांसह कापड दुकानदार, सराफ व्यावसायिक, रेडीमेड गारमेंट विक्रेते, होजिअरीची दुकाने, भांडयांची दुकाने, इलेक्ट्रिक आणि इलेक्ट्रॉनिक वस्तुंची दुकाने, हार्डवेअर दुकाने, फर्निचर शोरूम, परफ्युम आणि अगरबत्तीची दुकाने बंद राहिल्याने प्रचंड अस्वस्थता आहे. राज्यातील अन्य जिल्हयांमध्ये अनलॉक सुरू झाला असून, चुकीच्या धोरणांमुळे कोल्हापूर जिल्हा चौथ्या टफ्फ्यात अडकला आहे. कोरोनाची रूग्णसंख्या वाढण्यासाठी हे दुकानदार जबाबदार नाहीत. त्याची कारणे सर्वस्वी वेगळी आहेत. तरीही कोल्हापूर शहर आणि जिल्हयातील बहुसंख्य व्यापाऱयांना दुकाने, शोरूम बंद ठेवणे बंधनकारक करून, जिल्हा प्रशासनाने एकप्रकारे अन्याय केला आहे. एकिकडे या व्यापाऱयांकडून सर्व प्रकारचा कर घेतला जातोय. लाईट, पाणी, घरफाळा बिलांची वसुली केली जात आहे.
बँकेंच्या कर्जांचे व्याजासह हप्ते सुरू आहेत. कामगारांचा पगार, महापालिका परवाना फी असे खर्च थांबलेले नाहीत. पण व्यापारी वर्गाच्या अडीअडचणींचा कसलाही विचार न करता, जिल्हा प्रशासनाने व्यापाऱयांवर लॉकडाऊन लादला आहे. वास्तविक रस्त्यावरील गर्दीला हे व्यापारी किंवा दुकानदार जबाबदार नाहीत. कारण प्रत्येक व्यापारी आपल्या दुकानात गर्दी होणार नाही, याची काळजी घेवून सुरक्षेच्या सर्व नियमांचे पालन करत आहे. तरीही लॉकडाऊनमध्ये व्यापारी वर्ग सर्वाधिक भरडला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने समविषम तारखेस किंवा अन्य काही नियम लावून, व्यापार सुरू करण्यास परवानगी दयावी. किमान सकाळी 9 ते सायंकाळी 4 या वेळेत तरी सध्या सर्व दुकाने उघडण्यास अनुमती दयावी, असे पत्रकात म्हटले आहे.