प्रतिनिधी /मडगाव :
उत्तर गोव्यातून मडगावात येऊन मेसर्स कृष्णी वाळके हे ज्वेलरी दुकान लुटणे हाच आरोपींचा हेतू होता, अशी माहिती गोव्याचे पोलीस महासंचालक मुकेश कुमार मीना यांनी काल गुरुवारी दुपारी दिली. दक्षिण गोव्याच्या पोलीस मुख्यालयात घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली.
स्वप्नील वाळके खून प्रकरणाचा तपास चालू असून सध्या जी माहिती हाती आलेली आहे त्यावरुन या खुनाचे कारण स्पष्ट होत आहे. आरोपी मुश्ताफा शेख (24) हा सोन्याच्या मेसर्स वाळके या दुकानात आत आला तेव्हा पिस्तूलाचा धाक दाखविल्यानंतर दुकानदार घाबरेल आणि सोन्याचे दागिने लुटण्यास अनुमती देईल अशी त्याची अपेक्षा होती. याच अपेक्षेने आरोपी मुश्ताफा शेखने स्वप्नील यांना पिस्तूल दाखवले. मात्र पिस्तूल दाखवताच अंगाने धष्टपुष्ट असलेल्या स्वप्नील यांनी त्या हल्लेखोराशी दोन हात केले तेव्हाच हल्लेखोरांचे गणित गडबडले आणि आरोपी मुश्ताफाने गोळी झाडली. गोळी झाडल्यानंतर जखमी झालेल्या स्वप्नील यांनी एका आरोपीला पकडण्याचा प्रयत्न केला तेव्हा आरोपीकडे पलायन करण्यावाचून दुसरा पर्याय नव्हता, असे मीना यांनी सांगितले.
लुटीसाठी ‘कृष्णी वाळके’ दुकानच का?
हल्लेखोरांनी हेच ज्वेलरी दुकान लुटण्याचा निर्णय का घेतला? असा सवाल पत्रकारांनी विचारला तेव्हा या टोळीने दोन-तीन महिन्यांपूर्वी मडगावात येऊन ज्वेलरी दुकानांची पाहणी केली होती. त्यावेळी दोन-तीन ज्वेलरी दुकानांची त्यांनी निवड केली होती. मात्र, वाळके यांचे दुकान इतर दुकानापेक्षा अधिक आडोशाला असल्यामुळे हल्लेखोरांनी हे दुकान लुटीसाठी निवडले होते, असेही मीना यांनी सांगितले.
‘त्या’ बालेनोचा मालक कोण?
स्वप्नील वाळके यांचा खून ज्या ठिकाणी झाला तेथे क्रमांक नसलेले एक बालेनो वाहन सापडले होते. आरोपी याच बालेनो वाहनातून सांताक्रूझहून मडगावात आले होते. जाताना बोलेनो वाहन घटनास्थळी ठेऊन दुचाकीने फेंडामार्गे उत्तर गोव्यात गेले होते. हे बालेनो वाहन कोणाचे हा प्रश्न यावेळी पोलीस प्रमुखांना विचारण्यात आला तेव्हा दोनापावला येथील व सध्या इंग्लंडमध्ये राहात असलेल्या इगन रॉड्रिग्स यांच्या मालकीचे आहे. इगन रॉड्रिग्स यांचा दोनापावला येथे बंगला आहे. या चोरटय़ांनी हा बंगला फोडला आणि बंगल्यातून या वाहनाची चावी मिळवून या वाहनाने सर्वजण मडगावात आले होते, असे मीना म्हणाले.
म्हणून प्रकरण क्राईम ब्रँचकडे दिले
गुन्हा घडल्यानंतर अवघ्या दोन-तीन दिवसांतच हे प्रकरण क्राईम ब्रँचकडे देण्यात आले, हे पोलीस प्रमुखांच्या नजरेला आणून देण्यात आले तेव्हा मडगाव पोलिसांकडे आधीच ज्यादा काम आहे, त्यात या खून प्रकरणाचा सखोल तपास आणि योग्य पद्धतीने तपास करण्यात यावा म्हणून आपणच खुनाचे हे प्रकरण गुन्हा अन्वेषण विभागाकडे देण्याचा निर्णय घेतला, असे त्यांनी सांगितले.
पोलिस महांचालकांकडून स्वप्नीलचे कौतुक
यावेळी पोलिस महांचालकांनी स्वप्नील वाळके यांचे कौतुक केले. गंभीररित्या जखमी असूनही त्यांनी हल्लेखोरांशी दोन हात केले. गोळी लागलेली असतानाही त्यांनी हल्लेखोराला पकडण्याचा प्रयत्न केला आणि ही बाब अत्यंत कौतुकास्पद अशी आहे. दुर्देवाने त्यांना आपला प्राण गमवावा लागला, पोलीस प्रमुख म्हणाले.
आरोपी ज्वेलरी दुकान लुटायलाच आले होते
यावेळी एका पत्रकाराने पोलीस प्रमुखाना प्रश्न विचारला. अंजुणे येथे एका बंगल्यातून सोन्याची चोरी झाली होती. ज्वेलरी दुकाने गोव्यातील प्रत्येक शहरात आहेत, मात्र, हल्लेखोर ते सोने विकण्यासाठी मडगावलच का आले होते, असा सवाल पत्रकाराने केला तेव्हा चोरी कोठे करायची, चोरीचा माल कोठे विकायचा तसेच हा हल्ला दुपारीच का करण्यात आला, इतर वेळेत का नाही हे गुन्हेगारच ठरवीत असतात. दिल्लीत चोऱया, दरोडे दिवसाही होत असतात, वाळके प्रकरणात ते त्यांचे ज्वेलरी दुकान लुटायला आले हेते, असे ते म्हणाले. निश्चित किती वाजता गोळी झाडण्यात आली असा सवाल केला असता सध्या या खून प्रकरणाचा तपास चालू आहे आणि या तपासात आपण ढवळावळव करणार नसल्याचे त्यांनी सांगितले.









