प्रतिनिधी/ खेड
तालुक्यातील घाणेखुंट येथील गवळीवाडी येथून येथील पोलिसांनी 8 लाख 6 हजार रूपयांचा गुटखा जप्त केला. या प्रकरणी तैयब सत्तार मेमन (39, रा. गवळीवाडी-घाणेखुंट) याच्यावर येथील पोलिसांनी गुरूवारी रात्रीच्या सुमारास कारवाई केली.
घाणेखुंट-गवळीवाडी येथील एका दुकानाच्या गोडाऊनमध्ये गुटख्याचा साठा करून ठेवला असल्याची गोपनीय माहिती येथील पोलिसांना मिळाली. त्यानुसार जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग, पोलीस उपविभागीय अधिकारी शशिकिरण काशिद, पोलीस निरीक्षक निशा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुजित गडदे व पथकाने धाड टाकली.
अवैध गुटखा विक्री करणाऱयांचे धाबे दणाणले
या पथकात पोलीस उपनिरीक्षक योगेश मोरे, घाणेकर, पोलीस शिपाई संकेत गुरव, विनायक येलकर, रूपेश पेढामकर यांचा समावेश होता. या धाडीत 8 लाख 6 हजार रूपयांचा एमआरडी व विमल गुटखा जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी केलेल्या कारवाईने बेकायदेशीरपणे गुटखा विक्री करणाऱयांचे धाबे दणाणले आहेत.









