वार्ताहर / पालये
दी गोवा कपिला मल्टिपर्पज कॉ-ऑप. सोसायटी लिमिटेड, मांदे शाखेमध्ये झालेल्या एका छोटेखानी कार्यक्रमात पतसंस्थेचे चेअरमन तथा माजी मुख्यमंत्री प्रा. लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या हस्ते मोफत मास्क प्रदान करण्यात आले. दरम्यान, हरमल व मोरजी शाखांमधूनही मास्क प्रदान करण्यात आले.
केविड 19 च्या संसर्गजन्य रोगाच्या पार्श्वभूमीवर या मास्कचे वितरण मोफत करण्यात आले. याचा ग्राहक व अन्य नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही प्रा. पार्सेकर यांनी केले. हरमल पंचक्रोशी शिक्षण मंडळाच्या उच्च माध्यमिक विभागाच्या व्यावसायिक शाखेच्या विद्यार्थ्यांच्या सहकार्याने हे मास्क आरोग्य खात्याच्या मार्गदर्शनानुसार दर्जेदार बनविले गेले आहेत. पतसंस्थेला लाभलेल्या लाभांशातील 2 टक्के निधीचा वापर या समाजोपयोगी कार्यासाठी केल्याचे प्रा. पार्सेकर म्हणाले. मास्क विक्रीच्या नावाखाली काही व्यावसायिकांनी अव्वाच्या सव्वा दर आकारून ग्राहकांची लूट केल्याचे चित्र निदर्शनास आले. त्यामुळे सामाजिक बांधिलकी जोपासण्याच्या हेतूने हा मोफत मास्क प्रदान करण्याचा उपक्रम पतसंस्थेतर्फे राबविला असल्याचे प्रा. लक्ष्मीकांत पार्सेकर म्हणाले.