अमरावती \ ऑनलाईन टीम
मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या हरिसाल येथील आरएफओ दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणी अटक करण्यात आलेला आरोपी उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार यास न्यायमूर्ती एम. एस. गाडे यांच्या न्यायालयाने २९ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणातील मुख्य आरोपी विनोद शिवकुमार हा रातोरात मेळघाटातून फरार झाला होता. मात्र अमरावतीच्या स्थानिक गुन्हे शाखेकडून त्याला २६ मार्चला नागपूर रेल्वे स्थानकातून अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यास अमरावती येथे आणून लगेच कालच सायंकाळी धारणी पोलिसांच्या ताब्यात दिले होते. धारणी पोलिसांनी त्याचे जबाब नोंदवून वैद्यकीय तपासणीनंतर अटक केली होती.
धारणी पोलिसांनी आज, आरोपी विनोद शिवकुमार याला दिवाणी न्यायालयाचे प्रथम क्षेणी न्यायाधीश एम. एस. गाडे यांच्या न्यायालयासमोर हजर करण्यात आले. दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येसंदर्भात सक्षम व सबळ पुरावे गोळा करण्यासाठी मेळघाटचे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय काळे यांनी सरकारी वकिलामार्फत बाजू मांडून आरोपीला चार दिवसांची पोलीस कोठडी देण्याची विनंती केली होती. तर आरोपीकडून अॅड. सुशील मिश्रा व अॅड. संदीप सिंह ठाकूर यांनी युक्तीवाद केला. न्यायाधीश एम. एस. गाडे यानी बचाव पक्षाचा युक्तीवाद फेटाळून आरोपी विनोद शिवकुमार याला २९ मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
दीपाली चव्हाण हिच्या आत्महत्येनंतर तिला न्याय मिळावा, अशी मागणी होत आहे. दीपालीने वरिष्ठांच्या जाचाला काटाळून आत्महत्या केल्याचे सुसाई़़ड नोटमध्ये म्हटले आहे.
Previous Articleसांगली : आष्टा येथे महाविद्यालयीन तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या
Next Article ”फोन टॅपिंगचा अहवाल नवाब मलिकांनी फोडला”








