दीपक प्रियोळातून तर भाटीकर फोंडय़ातून लढणार
प्रतिनिधी /फोंडा
मगो पक्षाचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी सोमवारी प्रियोळ मतदारसंघातून तर डॉ. केतन भाटीकर यांनी फोंडा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. दीपक ढवळीकर हे यंदा पाचव्या वेळी तर डॉ. केतन भाटीकर पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक लढवित आहेत. मगो पक्षाने बारा जागांवर आपले उमेदवार उभे केले असून त्यापैकी बहुतेक विजयी होतील व पुढील सरकार मगो-तृणमूल युतीचेच असेल असा दावा दीपक ढवळीकर यांनी यावेळी बोलताना केला.
प्रसार माध्यमांवरील निर्बंध हटवा
गोव्यात मगो-तृणमूल युती हाच योग्य पर्याय असून जनता हा बदल निश्चितच घडवून आणणार असे ढवळीकर म्हणाले. निवडणूक ही लोकशाहीची महत्वाची प्रक्रिया असल्याने निवडणूक आयुक्तानी लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या प्रसारमाध्यमांवरील निर्बंध काढून टाकण्याची मागणी दीपक ढवळीकर यांनी केली. प्रत्येक उमेदवाराची उमेदवारी अर्ज भरतानाची प्रक्रिया पारदर्शकपणे जनतेसमोर दिसणे गरजेचे आहे. त्यामुळे हे निर्बंध हटवून व कोरोनासंबंधी मार्गदर्शक तत्वांचे पालन करुन प्रसारमाध्यमांना उमेदवारी अर्ज भरण्याच्या कक्षात प्रवेश देण्याची विनंती त्यांनी केली.
मगो पक्ष फोंडय़ातील चारही जागा जिंकणार – डॉ. भाटीकर
डॉ. केतन भाटीकर यांनी फोंडय़ातील चारही जागा मगो पक्ष जिंकणार असल्याचे सांगून आपण स्वतः 13 ते 15 हजार मतांनी विजयी होऊ असा दावा केला. फोंडय़ात यापुढे जातीधर्माचे राजकारण चालणार नाही. विकासाच्या राजकारणाला आम्ही प्राधान्य देणार असे ते म्हणाले. यावेळी त्यांच्यासोबत मगो कार्यकर्ते मोठय़ासंख्येने उपस्थित होते.









