प्रतिनिधी /पेडणे
नईबाग-पेडणे येथील दीपक दत्ताराम काणेकर (वय 40) हे तेरेखोल नदीत शनिवारी दि. 24 रोजी पाय घसरुन पडल्याने पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले. रविवारी त्यांचा शोध सुरू होता. मात्र त्यांचा मृतदेह सापडला नव्हता. सोमवारी सकाळी भालखाजन येथे हा मृतदेह सापडला.
सोमवारी सकाळी मृतदेहाची माहिती मिळताच पेडणे पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक हरिश वायंगणकर यांनी घटनास्थळी भेट दिली. सदर मृतदेह किनारी पोलीस तसेच पेडणे अग्निशामक दलाच्या जवानांनी पाण्याबाहेर काढला. किनारी पोलीस विभागाचे पोलीस कर्मचारी महेश देसाई यांनी विशेष परिश्रम घेतले. उपनिरीक्षक हरिश वायंगणकर यांनी पंचनामा करून तो शवचिकित्सा करण्यासाठी गोवा वैद्यकीय महाविद्यालय बांबोळी येथे पाठविला. संध्याकाळी मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. सायंकाळी नईबाग येथे स्थानिक स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
दीपक यांच्या पश्चात आई व विवाहित बहीण, चुलत बंधू असा परिवार आहे. दै. तरुण भारतचे दिवंगत पत्रकार दत्ताराम काणेकर यांचे ते पुत्र होत.









