वाढत्या रुग्णसंख्येमुळे चिंतेत भर
प्रतिनिधी /बेळगाव
बेळगाव जिल्हय़ात ब्लॅक फंगसच्या रुग्णांची संख्या वाढती आहे. याबरोबरच मृत्यूचे प्रमाणही वाढत चालले असून त्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. गेल्या दीड महिन्यात ब्लॅक फंगसने जिह्यातील 33 जणांचा बळी गेला आहे, अशी माहिती उपलब्ध झाली आहे. त्यामुळे एकच खळबळ माजली आहे.
आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी सायंकाळपर्यंत जिह्यातील ब्लॅक फंगस बाधितांची संख्या 289 इतकी आहे. त्यापैकी 180 जणांवर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले आहेत. आतापर्यंत 96 बाधित रुग्ण उपचारांती पूर्णपणे बरे झाले आहेत. त्यामुळे त्यांना घरी पाठविले आहे.
61 ब्लॅक फंगस बाधितांवर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. 289 पैकी 109 जणांनी खासगी इस्पितळांत उपचार घेतले आहेत. केवळ दीड महिन्यात ब्लॅक फंगसमुळे 33 जणांचा मृत्यू झाला आहे. बिम्स प्रशासनावर प्रादेशिक आयुक्त अमलान आदित्य बिस्वास यांची नियुक्ती झाल्यानंतर कोरोना रुग्णांबरोबरच ब्लॅक फंगस बाधितांवर उपचार करण्यास प्राधान्य देण्यात आले आहे. त्यासाठी आवश्यक तयारी करण्यात आली आहे.
जिल्हा आरोग्य व कुटुंब कल्याण अधिकारी डॉ. एस. व्ही. मुन्याळ यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. गेल्या दीड महिन्यात 33 जणांचा मृत्यू झाला आहे. ब्लॅक फंगस बाधितांवर उपचारासाठी आवश्यक औषधाचा साठा उपलब्ध आहे. कोरोनाची दुसरी लाट ओसरती आहे. आता तिसऱया लाटेचा सामना करण्यासाठी आरोग्य विभागाने तयारी सुरू केल्याचे त्यांनी सांगितले.









