साखर आयुक्त शेखर गायकवाड यांची ‘तरुण भारत’ ला माहिती
सांगली / विशेष प्रतिनिधी
येता गळीत हंगाम १४५ ते दीडशे दिवस चालेल. शेतकऱ्यांचा सगळा ऊस गाळप केला जाईल आणि इथेनॉल निर्मितीसाठी साखर वळवली जाईल असे मत साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी ‘तरुण भारत’शी बोलताना व्यक्त केले.
राज्यातील 100 टक्के एफआरपी दिलेल्या आणि न दिलेल्या साखर कारखान्यांची वर्गवारी शेतकरी सभासदांपुढे जाहीर करण्याच्या क्रांतिकारी प्रयत्नानंतर यंदा साखर आयुक्तांनी शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक होणार नाही यावर भर देण्याचे निश्चित केले आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात झालेला पाऊस लक्षात घेता ऊसाची उपलब्धता ही मोठ्या प्रमाणावर असणार आहे. त्यामुळे आपल्याकडे उपलब्ध असलेला ऊस संपूर्णतः गाळला जाणार की फरफट होणार याबाबत शेतकऱ्यांमध्ये चिंता आहे.
याबाबत ‘तरुण भारत’ने साखर आयुक्त शेखर गायकवाड यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, राज्यात चालू 2021-22 च्या गाळप हंगामात उपलब्ध असलेला सर्व ऊस सर्वसाधारणपणे 145-150 दिवसात गाळप होईल. तेवढी साखर कारखान्यांची स्थापित गाळप क्षमता असल्याने व इथनॉल उत्पादनाकरिता साखर वळविली जाणार असल्याने शेतक-यांनी आपला ऊस गाळप होईल की नाही याबाबत शंका घेऊ नये. प्रादेशिक सह संचालक (साखर) व साखर आयुक्त कार्यालय स्तरावरही ऊस गाळपाच्या संदर्भात नियमितपणे आढावा घेतला जाणार आहे. साखर उत्पादनाबरोबरच इथेनॉल निर्मिती वर भर देण्याचा प्रयत्न असून त्यासाठी राज्यातील साखर वळवली जाणार आहे. या प्रयत्नांनी शेतकरी चिंता मुक्त होईल आणि साखर कारखान्यांना ही एक नवा सोर्स निर्माण होईल यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. साखर कारखान्यांना निर्माण होणारी आर्थिक अडचण कोणत्या पद्धतीने दूर करता येईल आणि बँकांकडे कर्जासाठी न जाता जसजशी साखर उत्पादित होईल तस तशी विक्रीला परवानगी देऊन पैसा उभा करता येईल का? आणि त्यामुळे व्याजावर होणारा खर्च कमी करता येईल का या दृष्टीनेही साखर आयुक्त कार्यालय कार्यरत असल्याचेही त्यांनी सांगितले. हा प्रयत्न यशस्वी झाला तर कर्जाचे ओझे न घेता कारखान्यांकडे पैशाचा फ्लो सुरू होईल आणि व्याजाच्या दबावातून ही मुक्ती होईल. ज्यामुळे शेतकऱ्यांनाही त्याचा लाभ देणे शक्य होऊ शकेल असे साखर आयुक्त गायकवाड यांनी यावेळी सांगितले.
Previous Articleकर्नाटक: दसऱ्यानंतर प्राथमिक शाळा होणार पुन्हा सुरू
Next Article ईडीने जप्त केलेल्या डीएसकेंच्या बंगल्यात चोरी








