ऑनलाईन टीम / मुंबई :
दिशा सालियनवर मृत्यूपूर्वी लैगिंक अत्याचार झाल्याचे आरोप करणाऱ्या राणे पिता-पुत्रांना दिलासा मिळाला आहे. दिंडोशी सत्र न्यायालयाने 15 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांचे पुत्र आमदार नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.
दिशा सालियन दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूतची मॅनेजर होती. सुशांतच्या आत्महत्येपूर्वी तिने काही दिवसांपूर्वी आत्महत्या केली होती. यानंतर कॉन्ट्रोव्हर्सीला सुरुवात झाली. दिशा सालियनवर लैंगिक अत्याचार करून हत्या झाली आहे. ती गरोदरही होती. तसेच तिच्यावर लैंगिक अत्याचार होत असताना एका मंत्र्याचे सुरक्षारक्षक फ्लॅटबाहेर होते, असा दावा नारायण राणे यांनी केला होता. त्यानंतर नारायण राणे यांचे पुत्र नितेश राणे यांनीही अशाचप्रकारच्या आरोपांची राळ उडवून दिली होती. या प्रकरणावर सालियन कुटुंबीयांनी आक्षेप घेत राज्य महिला आयोगाकडेही दाद मागितली होती.
त्यानंतर महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पोलिसांकडून दिशा सालियन मृत्यूप्रकरणाचा अहवाल मागितला होता. या अहवालात दिशा सालियनच्या शवविच्छेदन अहवालात तिच्यावर बलात्कार झाल्याचे किंवा ती गरोदर असल्याचे नमूद केलेले नाही. ही बाब पोलिसांच्या निदर्शनास आणून देत महिला आयोगाने नारायण राणे आणि नितेश राणे यांच्यावर मालवणी पोलीस ठाण्यात खोटे आरोप केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. काही दिवसांपूर्वीच मालवणी पोलीस ठाण्यात या दोघांची तब्बल 9 तास चौकशी झाली होती. या प्रकरणात अटकेच्या भीतीने नारायण राणे आणि नितेश राणे सुरुवातीपासूनच अटकपूर्व जामीनासाठी प्रयत्न करत होते. अखेर सत्र न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर करत या दोघांनाही दिलासा दिला आहे.








