इवांका ट्रम्प यांना बदलावी लागली मुलांची शाळा : अन्य पालकांच्या तक्रारी
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची कन्या इवांका यांना कोरोना विषाणूसंबंधीच्या दिशानिर्देशांचे पालन न केल्याप्रकरणी स्वतःच्या मुलांचे नाव शाळेतून काढून घ्यावे लागले आहे. इवांका आणि तिचे पती जेरेड कुशनेर यांनी आता स्वतःच्या तीन मुलांची नावे अन्य शाळेत घातली आहेत.
इवांका आणि तिचे पती जेरेड यांनी अनेकदा सार्वजनिक स्वरुपात पालकांसाठी देण्यात आलेल्या कोरोनासंबंधीच्या दिशानिर्देशांचे उल्लंघन केले होते अशी माहिती शाळेच्या व्यवस्थापकांनी दिली आहे. इवांका आणि जेरेड यांनी अनेकदा शाळेच्या पॅरेंट हँडबुकमध्ये नमूद कोविड-19पासून बचावाच्या दिशानिर्देशांचे पालन केलेले नाही. अनेक तक्रारी, मास्क परिधान आणि सोशल डिस्टन्सिंग पालनाच्या विनंतीनंतर इवांका यांना स्वतःच्या मुलांना शाळेतून बाहेर काढणे भाग पडले आहे.
इवांका आणि जेरेड पालकांसाठीचे नियम मानत नसल्याची तक्रार अन्य पालकांनी केली होती. यानंतर शाळेने इवांका आणि जेरेड यांच्यासमोर स्वतःची भूमिका मांडली होती. मोठय़ा प्रमाणावर कोरोनाबाधित असलेल्या वातावरणात इवांका आणि जेरेड काम करत असल्याने शाळेला मोठी चिंता सतावत होती. डोनाल्ड ट्रम्प आणि मेलानिया कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यावरही इवांका यांनी स्वतःला विलगीकृत केले नव्हते.









