प्रतिनिधी/ फोंडा
म्हलारीमळ-कोडली तिस्क येथील मुकबधिर ज्येष्ठ दांपत्यांची वडिलोपार्जित जमीन स्वत:च्या पुढील पिढीला राखून ठेवण्यासाठी सरकार दरबारी हेलपाटे घालावे लागत आहे. मालकी हक्क असलेल्या जमिनीत राहूनही ज्येष्ठ नागरिकांना बेकायदेशीरित्या सरकारी जागेत राहत असलेल्या लोकांकडून दररोज त्रास सहन करावा लागत असल्याची व्यथा त्यानी मांडली आहे. आपल्या जागेतून रस्ते उभारणीसाठी कुणी परवानगी दिली? याबद्दल किर्लपाल-दाभाळ पंचायत व इतर सरकार दरबारी दाद मागण्यास गेल्यास केवळ हेलपाटे घालावे लागत असून सर्व सरकारी यंत्रणा त्याच्यासाठी मुकबधिर बनल्या आहेत. ही करूण कहाणी आहे संतोष भानू गावकर (74) व सुलक्षा संतोष गावकर (63) या मुखबधिर दांपत्याची. याप्रकरणी ज्येष्ठांची एकमेव आधार असलेली मुलगी तारा संतोष गावकर ही लढा देत असून आपल्या आईवडिलांच्या सांकेतिक भाषेची व्यथा तिने आपल्या तेंडी मांडली आहे.
म्हलारीमळ,कोडली-तिस्क हा दुर्गम भाग असून येथे दिव्यांग गावकर दांपत्यांची सर्व्हे नं. 30/32 नोंदणीकृत सुमारे 21 हजार चौ.मिटर जागा आहे. सदर जागेच्या मालकाच्या परवानगीशिवाय एका बेकायदेशीरित्या सरकारी जागेत राहत असलेल्या कुठूंबासाठी बेकायदेशीरित्या रस्ता बनविण्यात आलेला आहे. हा रस्ता कुणी बनविला याची माहिती देण्यास सरकारी यंत्रणा अपयशी ठरली आहे. सदर रस्ता आपल्या जागेतून जात असल्याने त्यावर दिव्यांग गावकर दांपत्यांनी विरोध दर्शविला असून सातत्याने सरकारी दरबारी न्याय मागण्यासाठी दरवाजा ठोठावला असता कायम निराशा लाभल्याची व्यथा सदर कुटूंबियांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केली आहे.
मुकबधीर दांपत्यांसाठी लढा बनला जीवघेणा
दिव्यांग दांपत्यांना कोणतीही पुर्वसुचना न देता पंचायतीने आपल्या मालकी हक्केच्या जागेतून रस्ता बनविल्याचा तक्रार स्थाकि पंचायत कार्यालय, मामलेतदार, उपजिल्हाधिकारी कार्यालयात पत्रव्यवहार केला असून कोणतेच सकारात्मक उत्तर अजूनपर्यंत मिळालेले नाही. यासंबंधी माहिती हक्क कायद्याखाली असा ना हरकत दाखला दिल्याची माहितीही उपलब्ध नाही. सदर कुटूंबियांची परिस्थिती हलाखीची असून मुलीच्या कमाईवर कुटूंबाचा उदारनिर्वाह चालत आहे. एखाद्या वकिलामार्फत न्यायालयीन लढा लढणेही कुटूंबियांनी परवडणारे नाही. विविध ठिकाणी तक्रार दाखल करण्याकरिता दिव्यांग दांपत्यांना जाणे अवघड असल्यामुळेच वारंवार काम सोडून मुलगी तारा हिला जावे लागत आहे.
उतारवयातील ज्येष्ठांच्या आरोग्याच्या समस्याही अधूनमधून उद्भवत असते. अशा परिस्थितीत आपल्या नावावर असलेल्या जमिनीत होणाऱया गैरकारभारासाठी न्यायहक्काची लढाई लढावी लागत असल्यामुळे सदर कुटूंबिय हैराण बनले आहे. पंचायत व शेजाऱयाकडून आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. याप्रकरणी कुडचडे पोलीस स्थानकात तक्रार नोदविल्यानंतरही पोलिसांकडून कोणतीच कारवाई संशयिताविरोधात होत नसल्याची माहिती सदर कुटूंबियांनी दिली आहे.
बेकायदेशीरवाले बिनधास्त, कायदेशीरवाल्य़ांना उटाबश्या
म्हलारीमळ येथे वनखात्याच्या सरकारी जमिनीत एका कुटूंबियांनी बेकायदेशीरित्या वास्तव्य केले आहे. त्यानी ज्येष्ठांच्या घरालागून उभारलेल्या कुंपणावरूनही अनेकवेळा चटके उडत आहे. आपल्या जमिनीतील झाडांची फांद्या विनापरवागी कापण्यात येत असल्याची तक्रारही दिव्यांगांनी केलेल्या आहेत. बहुतेकवेळी घरात दांपत्य एकटेच असून मुलगी कामाला जात असल्याने प्रचंड दहशतीखाली जीवन व्यथित करण्याची वेळ आली आहे. सदर कुटूबियांना नकळत तीन रस्ते यांच्या जमिनीतून काढण्यात आले असून यासाठी कोणतीही परवानगी व जमीन दानपत्रावर दिली नसल्याची कबूली या दांपत्यांच्यावतीने मुलीने दिली आहे.
जमिनीची मालकी हक्क आपल्या कुटूंबियाकडे असतानाही विनपरवानगी बनविण्यात आलेल्या रस्त्याच्या डागडूजी व हॉटमिक्सीकरणासाठी एका नागरिकांने पंचायतीकडे विनंती करणे कुठल्या कायद्यात बसते ? किर्लपाल दाभाळ पंचायतीने आधी रस्ता कायदेशीर आहे की नाही याची शहानिशा करावी त्यानंतरच पुढील कृती करावी. हलाखीच्या परिस्थितीत दिवस काढणाऱया दिव्यांग कुटूंबियांसाठी सर्व सरकारी यंत्रणाच मुकबधिर बनल्याचा आरोप केला असून मानवतेच्या दृष्टीकोनातून आपल्या कुटूंबियांना न्याय मिळावा अशी विनंती तारा गावकर यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यांशी केली आहे.









